सासवडकर आदल्या दिवशी माउलींचे स्वागत करतील
By : प्रशांत चव्हाण
पुणे :
जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा । आपुलिया ।।
अशी आस मनात ठेवत संत सोपानदेवांच्या पालखीचे येत्या सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान होत असून, सासवडनगरीत लगबग सुरू झाली आहे. या अनुषंगाने पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व अंजनगाव येथून निघाले असून, जेजुरीचा शनिवारचा मुक्काम आटोपल्यानंतर रविवारी हे अश्व सासवडमध्ये दाखल होणार आहेत.
याशिवाय संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळाही दिवे घाटाचा टप्पा पार करून रविवारी भागवत एकादशीच्या दिवशी सासवडमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सासवडकर आदल्या दिवशी माउलींचे स्वागत करतील, तर दुसऱ्या दिवशी सोपानदेवांना निरोप देतील.
आता माउलींच्या बंधूंचा म्हणजेच सोपानदेवांच्या पालखीचाही प्रवास सुरू होत आहे. श्री संत सोपानकाका आषाढी वारी पालखी सोहळा सोमवारी 23 जून रोजी सासवड येथील देऊळवाड्यातून 1 वाजता प्रस्थान ठेवणार आहे. संत सोपानदेवांच्या पालखीसोबत अंजनगाव येथील अजित परकाळे यांचे अश्व असतात.
शुक्रवारी सकाळी अश्वांचे बारामतीतील अंजनगाव येथून टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले. त्याआधी सकाळी अश्वांना मंगल स्नान घालण्यात आले. परकाळे कुटुंबातील महिलांनी अश्वांचे औक्षण केले. दोन्ही अश्व रविवारी भागवत एकादशीच्या दिवशी सासवडला पोहोचतील.
परकाळेंच्या घरामध्ये ही सेवा गेली साठहून अधिक वर्ष चालू आहे. रामचंद्रबुवा परकाळेंच्या काळात ही अश्वांची सेवा त्यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव सोपानकाका परकाळे यांनी 33 वर्ष अश्व घेऊन वारी केली. 2022 पासून अजित परकाळे अश्व घेऊन वारीत येतात. हे दोन्ही अश्व पालखी सोहळ्यासाठीच वापरले जातात.
सोहळा 3 जुलै रोजी 23 जूनला सासवड देऊळवाड्यातून निघाल्यानंतर पिंपळमार्गे पांगारे येथे पालखीचा मुक्काम असेल. 24 ला पालखी परिंचे, वीरमार्गे मांडकी भैरवनाथ मंदिर, 25 ला नीरामार्गे निंबूत विठ्ठल मंदिर, 26 जूनला सोमेश्वरनगर, 27 जूनला कोरहाळे बु., 28 जूनला बारामती, 29 जूनला लासुर्णे, 30 ला निरवांगी, 1 जुलैला अकलूज, 2 ला बोंडले, 3 जुलै रोजी बोंडले येथून दुपारी पालखी मार्गस्थ होऊन दुपारचा विसावा टप्पा येथे होईल.
त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान महाराज यांची बंधू भेट होईल. त्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी भंडी शेगाव येथे विसावेल. 4 जुलैला वाखरी मुक्कामी उभे रिंगण होणार आहे. तर 5 जुलै रोजी सोहळा पंढरपूर मुक्कामी पोहोचेल.








