बेळगाव : गोमटेश विद्यापीठ स्कूल मजगाव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीराने जी. जी. चिटणीस स्कूलचा 1-0 असा निसटता पराभव करुन विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात जी. जी. चिटणीसने गोमटेश विद्यापीठ हिंदवाडीचा 2-0 असा पराभव केला. चिटणीसच्या सोमेश्वर व केदारलिंग संभाजीचेने गोल केले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीराने केएलएसचा पेनल्टी शूटआउटवर 3-1 असा पराभव केला. निर्धारेत वेळेतील 14 व्या मिनिटाला केएलएसच्या प्रणव लाडच्या पासवर प्रेमने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रातील 25 व्या मिनिटाला संत मीराच्या अर्दाव गावडेच्या पासवर अब्दुल मुल्लाने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधून दिली. टायब्रेकरमध्ये संतमीराने 3-1 असा पराभव केला. संत मीरातर्फे अनिऊद्ध हलगेकर ,अथर्व गावडे यांनी गोल केले.
अंतिम लढतील संत मीराने जी. जी. चिटणीस स्कूलचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. संतमीरातर्फे अथर्व गावडेने एकमेव गोल केला. आता संत मीरा संघ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे गोमटेश स्कूल मजगांवचे मुख्याध्यापक महातेश हिरेमठ, प्रशासक प्रदीप पाटील, बापू, दयानंद बजंत्री, उमेश मजुकर, सी. आर. पाटील, कौशीक पाटील, यश सुतार, शिवकुमार सुतार, किरण तारळेकर, जयसिंग धनाजी या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









