विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
विद्याभारती जिल्हास्तरीय संघटना व देवेंद्र जिंनगौंडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा संघ, शांतीनिकेतन खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर खेळविण्यात आलेल्या प्राथमिक गटातील अंतिम लढतीत शांतीनिकेतन पब्लिक स्कूलने संत मीरा संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा गोल फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये शांतीनिकेतनने विजेतेपद पटकाविले. शांतीनिकेतनतर्फे आनंद पाटील, राम आलाहबादी, माज नाईक, ज्ञानेश्वर कुंभार, अखिल पाटील तर संत मीरा संघातर्फे महमंद फरान, रेहान आतार, सुमीत खंबी, रोहन यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
माध्यमिक गटातील अंतिम लढतीत संत मीरा अनगोळ संघाने शांतीनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 5-4 असा टायब्रेकरमध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये संत मीराने विजेतेपद पटकाविले. संत मीरा संघाच्या अब्दुल्ला मुल्ला, फैजान धामणेकर, पुथ्वीराज कंग्राळकर, साईराज कुराळेने प्रत्येकी 1 गोल केले. शांतीनिकेतन संघातर्फे प्रदीप राठोड, ईशांत देवलतर, प्रथमेश यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे अनगोळचे उद्योजक प्रशांत पानारे, पी. एस. कुरबेट, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वाडकर, गणपत गावडे, उदय, ओमकार गावडे, आशा भुजबळ यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी गंगा सानीकोप्प, यश सुतार, शिवकुमार सुतार, श्रद्धा पाटील, पंच म्हणून आदित्य सानी, स्वयंम ताशिलदार, प्रणव देसाई, स्वरूप हलगेकर, सिद्धार्थ वर्मा, अभिषेक गिरीगौडर यांनी काम पाहिले.









