सधन पुरुषांचे नाचगाणे करून मनोरंजन करणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय
By : ह.भ.प. अभय जगताप
सासवड :
योग याग तपें करितां भागली।
तीच ही माऊली विटेवरी ।।
न येई ध्यानीं साधिता साधनीं।
भक्तांसी निर्वाणीं धांवतसे ।।
चारी वेद साही शास्त्रं शिणलीं।
कान्होपात्रा लाधली प्रेमसुखें ।।
रे यारे सान थोर ।
याती भलते नारी नर ।।
करावा विचार ।
न लगे चिंता कोणासी ।।
असे वारकरी संप्रदायाचे जे आवाहन आहे, त्याला प्रतिसाद देत सर्व स्तरातून भाविक मंडळी वारकरी संप्रदाय सहभागी झाली. वारकरी संप्रदायामध्ये वारी करण्यासाठी ग्रंथ वाचनासाठी वीणा घेण्यासाठी, टाळ वाजवण्यासाठी आचाराचे बंधन आहे. पण, अमुक कुळात जन्म झाला पाहिजे, असे बंधन नाही.
त्यामुळे तुकोबांनी त्यांच्या अभंगांमध्ये ‘सजन कसाई’चा उल्लेखसुद्धा भक्त म्हणून केला आहे. अशाच प्रकारे समाजातील प्रतिष्ठेच्या बाबतीत बहिष्कृत समाज म्हणजे गणिका. सधन पुरुषांचे नाचगाणे करून मनोरंजन करणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. संत कान्होपात्रांचा जन्म मंगळवेढ्याला अशाच एका गणिकेच्या घरात शामा नायकिणीच्या पोटी झाला होता.
स्वाभाविक असल्यामुळे त्यांचा विठ्ठल भक्तीचा मार्ग खडतर होता. आपल्या प्रमाणेच आपल्या मुलीने नाचगाणे करून श्रीमंतांचे रंजन करावे आणि त्यातून पैसे मिळवावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. पण कान्होपात्रांचे मन यात रमत नव्हते. त्यांचा ओढा विठ्ठलभक्तीकडे होता. त्यांचे अभंग वाचले म्हणजे त्यांच्या प्रतिभेची, अभ्यासाची कल्पना येते.
त्यांच्या जीवन पिढीजात व्यवसायाचे मोठे संकट त्यांच्यापुढे असल्याने आर्त भावाने देवाची विनवणी करणारे त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत. पण याशिवाय इतर विषयावरील त्यांच्या काही अभंग रचना उपलब्ध आहे, त्यापैकीच हा एक अभंग. यामध्ये विटेवर आपल्यासाठी सुलभ असलेला देव इतरांना किती दुर्लभ आहे, हे कान्होपात्रांनी सांगितले आहे.
त्यानंतर की योगी ज्याच्यासाठी योग करून थपले थकले तपस्वी ज्याच्यासाठी तप करत बसले. याज्ञिकांनी ज्याच्यासाठी याग म्हणजे यज्ञ केले पण तरीही जो प्राप्त होत नाही, तोच हा देव विटेवर उभा आहे. अनेक प्रकारची साधने करून सुद्धा जो परमात्मा ध्यानामध्ये येत नाही. तो भक्तांकडे मात्र धावत येतो. चार वेद आणि सहा शास्त्री ज्याच्यासाठी कष्ट घेतात, म्हणजे सतत ज्याचे वर्णन करत राहतात, तो परमात्मा कान्होपात्रांना मात्र प्रेम सुखामुळे म्हणजे भक्तीने प्राप्त झाला आहे.








