सौंदर्य बोध असला तर प्रत्येक काम देखणं होतं. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधता आलं पाहिजे परंतु आम्ही नेहमी एखाद्या गोष्टीच्या वाईट बाबींचा विचार जास्त करतो. पांढरे शुभ्र शुभ्र कागदावर पडलेला काळा बारीक सूक्ष्म डाग आपल्याला सतत दिसतो पण पांढरेपणा मात्र आपण विसरून जातो. सौंदर्यबोध आत्मसात करायला लागतो. एखाद्या रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला मोठा दगड अडचणीचा वाटतो पण तोच दगड एखाद्या शिल्पकाराला शिल्प घडवायला मदत करतो ही उपजदृष्टी जशी कलाकाराला विविध रंगातून सुंदर भावविश्व निर्माण करायला शिकवते, त्याप्रमाणे एखाद्या निसर्गवेड्या माणसाला जंगलातून भटकताना दरी खोऱ्यातून फिरताना डोंगराकडे जाताना वेगवेगळ्या गोष्टी सौंदर्याच्या नजरेसमोर आणून ठेवते. जे आहे त्यातून सुबक सुंदर सजून देताना म्हणजे सौंदर्य बोध घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला तो मांडता येत असतो. कपड्यांच्या घड्या, भांडी मांडायची पद्धत यातून एखादी झोपडीसुद्धा देखणी दिसते तर सौंदर्य बोधाचा अभाव असलेला बंगलासुद्धा उकिरड्यासारखा वाटतो. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करणारे सौंदर्याचे उपासक प्रत्येक कणाला स्पर्श करण्याच्या प्रयत्नाने छोटंसं काम करतात पण ते अनेक पिढ्यांना मार्गदर्शन ठरणारे असते. असे सौंदर्यभूत असणारी माणसं हाताच्या स्पर्शाने डोळ्याचं काम करतात आणि लक्षात येतं आपण जगातल्या हजारो लाखो सौंदर्यापासून अस्पर्श राहिलेले आहोत. आजकाल आम्ही मोबाईलवर फोटो काढताना प्रत्यक्ष स्पर्शी सौंदर्य बोधापासून दूरच राहतो.
ज्याची अनुभूती प्रत्यक्ष डोळ्यांना येते. अंगावर रोमांच उभे करते आणि डोळ्यातून आसवांना मार्ग मोकळा करून देते आणि शेवटी आम्हाला समाधी अवस्थेला नेते, तो खरा सौंदर्य बोध. कीटकांची हालचाल, निसर्गातलं उगवणं मावळणं, सृष्टीचा लय विलय या सगळ्या गोष्टी विलक्षण सौंदर्याने नटलेल्या पाहणं, अनुभवणं म्हणजे सौंदर्याचा बोध. तो कधी निरागस बालकाच्या हास्यातून होतो तर कधी आदिवासींच्या सौंदर्यातून. आपल्याला आपल्या अस्तित्वाचा विसर पडणारी कलाकृती ज्याचे शब्दात रूपांतर करता येत नाही याची जाणीव इंद्रियांच्या पलीकडची असते. आम्ही शिकलो म्हणजे झालं असं वाटणारे जगात शंभर टक्के आहेत. त्यांना सगळं कळतं पण वळत नाही अशा माणसांना सौंदर्य बोध काय शिकवणार?








