अंजुणे धरणाची पाण्याची पातळी 82 मीटरवर
वाळपई : गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्यासह चोरला घाट परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे अंजुणे धरणामध्ये पाण्याचा साठा होऊ लागलेला आहे. सद्य परिस्थितीनुसार धरण वेगान भरत असून पाण्याची पातळी 82 मीटरवर पोचलेली आहे. येत्या चार दिवसात या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्यात धो धो पाऊस पडत आहे. खास करून डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या चार दिवसात धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. सध्यातरी धरणात पाण्याचा साठा वेगाने होत आहे. पाण्याची पातळी 82 मीटर वर पोचलेली आहे. 93 मीटर झाल्यानंतर धरण भरून पूर्ण झाल्यानंतर दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली
एकूण प्राप्त माहितीनुसार गेल्या चार दिवसांमध्ये आंदोलन धरण परिसरामध्ये एकूण 20 इंच पावसाची नोंद झालेली आहे. राज्यातील अनेक धरणामध्ये पाण्याचा साठा गतीने भरू लागलेला आहे. मात्र अजुंणे धरणात इतर धरणाच्या तुलनेत पाण्याचा साठा कमी आहे. आता मात्र मुसळधार पावसामुळे धरण गतीने भरू लागले आहे. ही एकंदर आनंदाचीच बाब आहे. दरम्यान गेल्या वर्षी या भागाच्या आमदार डॉ. देविया राणे यांच्या प्रयत्नातून या धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर विद्युत रोषणाई केली होती. विद्युत रोषणाईतून तिरंगा ध्वज साकारण्यात आला होता. यामुळे या भागामध्ये हा सुंदर नजराणा पाहण्यासाठी दररोज नागरिकांची गर्दी होताना दिसत होती. यंदाही अशाच प्रकारचे विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









