सांखळी : साखळी नगरपालिकेची सत्ता भाजप पक्षाने मिळवल्यानंतर आपल्या 11 नगरसेवकांपैकी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अनुक्रमे रश्मी देसाई व आनंद काणेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड करण्यात आली आहे. काल सोमवारी सकाळी रवींद्र भवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अकराही नगरसेवकांची विशेष बैठक संपन्न होऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही निवड जाहीर केली. त्यानंतर रश्मी देसाई यांनी नगराध्यक्षपदासाठी तर आनंद काणेकर यांनी उपनगराध्यक्षपदासाठी मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केले. या दोन्ही पदांसाठी केवळ एकच अर्ज आल्याने दोघांचीही निवड निश्चित झालेली आहे. सांखळी नगरपालिका स्थापन झाल्यानंतर नुकतीच झालेली ही निवडणूक या पालिकेची चौथी निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत 12 पैकी 11 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपला अशा पद्धतीचे यश कधीही आले नव्हते. 2013 च्या निवडणुकीत भाजपने 11 पैकी 6 नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळवले होते. परंतु केवळ 46 दिवसाच्या या सत्तेला सुऊंग लावण्यात आला व विरोधी गटात भाजपमधीलच एक दोन नगरसेवक सामील झाले. त्यामुळे भाजपला केवळ दीड महिन्यात सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर 2018 च्या निवडणुकीत 13 पैकी 10 उमेदवार विरोधी गटाचे तर केवळ 3 उमेदवार भाजपचे निवडणूक निवडून आल्याने या निवडणुकीतही सपशेल अपयश भाजपच्या हाती आले होते.
यावेळी सांखळीचे नगराध्यक्षपद हे प्रथमच महिलांसाठी राखीव असल्याने निवडून आलेल्या सहा महिलांपैकी कोणाची वर्णी या पदावर लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. परंतु या सर्व नगरसेविकांमध्ये रश्मी देसाई या अनुभवी व ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांची वर्णी या पदावर लागण्याची शक्यता दै. तऊण भारतने यापूर्वी वर्तवली होती. त्याचप्रमाणे संपूर्ण साखळीतही तीच चर्चा होती. हीच चर्चा आज खरी ठरली आहे. उपनगराध्यक्ष पद हे सर्वांसाठी खुले असे पद असून सध्या भाजपच्या निवडून आलेल्या 11 पैकी पाच नगरसेवक हे पुऊष व सर्व अनुभवी एक दोन वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत. त्यामुळे या पाचापैकी कोणाची वर्णी सर्वप्रथम या नगरपालिका मंडळावर लागणार याचीही उत्सुकता सर्वांना होती. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपने या पदासाठी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला मान देत त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. बाजार प्रभागात निवडून आलेले आनंद काणेकर यांना उपनगराध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. ही निवड ही अपेक्षित धरण्यात येत होती. आज मंगळवार 16 मे रोजी नगरपालिका सभागृहात होणाऱ्या शपथविधी व निवडणूक प्रक्रियेत या दोन्ही नगरसेवकांची औपचारिकपणे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येणार आहे.









