हत्तरगी टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी : पावसामुळे बळीराजाला दिलासा
संकेश्वर : संकेश्वरात मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शहरासह परिसरात पाणीच पाणी केले. तसेच यमकनमर्डी परिसरातही ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे येथील हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यल्लीमुन्नोळी गावातील ओढ्याला पावसाने प्रचंड पाणी आले होते. बसचालकाला ओढ्याचा अंदाज न आल्याने बस ओढ्याजवळ गेली असताना लोकांनी बस थांबवून विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान या पावसामुळे सायंकाळी 6 पासून वीजपुरवठा खंडित झाला होता.
13 सप्टेंबर रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे आगमन झाले होते. मात्र नक्षत्रकाळात पावसाने विश्रांती घेतली होती. या नक्षत्राचा 26 रोजी शेवटचा दिवस होता. दिवसभर कडक उन्ह असतानाच सायंकाळी 4 वाजता ढग दाटून आले. हलक्या सरीच्या पावसाला सुऊवात झाली. क्षणार्धात मुसळधार पावसाची हजेरी लागली. पावसाळी हंगामातील हा पाऊस मोठा झाला. राजा निलगार गणपतीचे दर्शन घेण्यास आलेल्या भाविकांची या पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती. काही भाविक दर्शन न घेताच माघारी परतले. पावसामुळे रस्ते व गटारी पाण्यानी तुडूंब भरून वाहत होत्या. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच ओढ्या-नाल्यातून पाणी वाहताना दिसले. हा पाऊस अखेरच्या टप्प्यात पिकांना पोषक ठरला आहे. आगामी आठवड्यात गळीत हंगामाला सुऊवात होणार असून उसासाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. 27 पासून हस्त नक्षत्राचे आगमन होत आहे. हस्त नक्षत्राच्या काळात पावसाचे प्रमाण कसे असणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यमकनमर्डी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
संकेश्वरनजीकच्या यमकनमर्डी परिसरात ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले. यामुळे येथील हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोठ्या पावसाच्या सरीमुळे वाहनचालकांना समोरील रस्ताच दिसत नव्हता. यामुळे त्यांना वाहने थांबविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पावसामुळे हत्तरगी परिसरात महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. तसेच नजीकच्या एकस कंपनीजवळ पावसाचे पाणी साचल्याने काही वाहने अडकून पडल्याचा प्रकारही पहावयास मिळाला. एकूणच या पावसामुळे सुमारे तासाहून अधिककाळ वाहतूक कोंडी होताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.