पोलीस-मनपाकडून संयुक्तरित्या मोहीम
बेळगाव : शहर व उपनगर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रहदारी पोलीस आणि महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी बेळगाव-सांबरा रोडवरील संकम हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. दुकानांबाहेर, त्याचबरोबर पदपथावर बहुतांश जणांनी अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले होते. त्यामुळे सदर साहित्य मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जप्त केले. मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर आणि उपनगरात अतिक्रमण करण्यात आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ते रुंद असतानादेखील अतिक्रमणामुळे अरुंद बनले होते. अतिक्रमण केलेल्यांना वारंवार सूचना करूनदेखील त्यांच्याकडून त्याचठिकाणी अतिक्रमण केले जात आहे.
गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, मध्यवर्ती बसस्थानक, रविवार पेठ, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, शहापूर आदी ठिकाणी अतिक्रमण हटविले जात आहे. कारवाईत सातत्य ठेवण्यात आल्याने काही प्रमाणात शहर व उपनगर अतिक्रमण मुक्त झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी बेळगाव-सांबरा रोडवरील संकम हॉटेल परिसरात सायंकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. अनेक जणांनी पदपथावर गॅरेजसह इतर व्यवसाय सुरू केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना आरक्षित असलेला पदपथच गायब झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालत जावे लागत होते. हा रस्ता बेळगाव-बागलकोट रस्त्याला जोडणारा असल्याने नेहमी रस्त्यावर वर्दळ असते. त्यामुळे बुधवारी पोलीस व मनपाकडून संयुक्तरित्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.









