इंडियन पेडीएट्रीक अकादमी व शिक्षण संचालनालयात करार
प्रतिनिधी / पणजी
इंडियन पेडीएट्रीक अकादमी आणि शिक्षण संचालनालय यांच्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हजेरीत समन्वय करार करण्यात आला असून त्याच्या माध्यमातून शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ असे त्या प्रकल्पास नाव देण्यात आले आहे. सदर प्रकल्पांतर्गत पेडीएट्रीक डॉक्टरांचे पथक शालेय मुले, शिक्षक, पालक यांच्यासाठी आरोग्य शिबिरे, कार्यशाळा घेणार असून मुलांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवण्यात येणार आहे. त्यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, फिट इंडिया अभियानाच्या दृष्टीने हा उपक्रम आखण्यात आला असून मुले, शिक्षक, पालकांत आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे. आमची पुढची पिढी जर सदृढ, सशक्त बनवायची असेल तर त्याची सुऊवात विद्यार्थी दशेपासूनच होणे गरजेचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य कसे राखावे याचेही धडे त्या उपक्रमातून देण्यात येणार आहे. हा उपक्रम मोफत असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
या उपक्रमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून लहान वयात मुलांना कोणतेही आजार होऊ नयेत म्हणून हा उपक्रम लाभदायक ठरणार आहे. पेडीएट्रीक अकादमीचे डॉक्टर्स तसेच शिक्षण खात्याचे संचालक शैलेंद्र झिंगडे व इतर मान्यवर मंडळी त्यावेळी उपस्थित होती. शिक्षकांनीही त्यासाठी हजेरी लावली होती. आल्तिनो – पणजी येथील जीएसटी भवनात हा कार्यक्रम झाला.









