आयुष्यभराची कमाई शाळेच्या इमारतीसाठी : निवृत्तीनंतरही घेतले शाळेला वाहून : इतरांना ठेवला आदर्श
सुशांत कुरंगी /बेळगाव
मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु अद्याप ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षण घेता येत नाही. मुलींना शिक्षण मिळावे, त्यांना चांगली शालेय इमारत मिळावी यासाठी शाळेतील निवृत्त शिपायाने आपल्या निवृत्तीतील रक्कम खर्च केली. एक-दोन नाही तर तब्बल 6 लाख रुपये देणगी देत त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. एक सामान्य शिपाई मुलींच्या शिक्षणासाठी व शाळेच्या आत्मियतेबद्दल आपल्या आयुष्यभराची कमाई देतो ही बाब कौतुकास्पद आहे.
कोरे गल्ली, शहापूर येथील न्यू गर्ल्स हायस्कूलचे शिपाई संजीव महादेव गावडे यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कितीही पैसा असला तरी दान करताना हात आखडता घेतला जातो. परंतु गावडे दादांनी आपल्या आयुष्याची पुंजीच शाळेसाठी देऊ केली. हाच विचार जर प्रत्येक नागरिकाने केला तर ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
शहापूर भागात मुलींना शिक्षण देणारे मराठी माध्यमाचे हायस्कूल म्हणून शाळेचे नाव आहे. शहरासोबतच धामणे, कलखांब, तारीहाळ, मुचंडी, अनगोळ, वडगाव येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. शाळेसाठी मोठी इमारत नसली तरी दर्जेदार शिक्षणामुळे आजही अनेक मुली शिक्षण घेत आहेत. शाळेतील मुलींना चांगल्या दर्जाच्या वर्गखोल्या मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी पेन्शनमधील रक्कम देऊ केली.
पेन्शनमधून बांधल्या वर्गखोल्या
निवृत्त होण्यापूर्वीच संजीव यांनी आपण शाळेसाठी काहीतरी करावे ही इच्छा मनाशी बाळगली होती. त्यांनी आपली ही इच्छा व्यवस्थापन मंडळासमोर मांडली. शाळेला पक्क्या वर्गखोल्या नसल्याने वर्गखोल्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इंजिनिअरने 8 लाख रुपयांचा खर्च सांगितला. त्यापैकी 6 लाख रुपये संजीव यांनी आपल्या पेन्शनच्या रकमेतून दिले तर उर्वरित 2 लाख रुपये व्यवस्थापन मंडळाने जमा केले. अशा पद्धतीने शाळेला दोन पक्क्या वर्गखोल्या मिळाल्या.
42 वर्षांची प्रदीर्घ सेवा
1978 मध्ये गावडे दादा न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये रुजू झाले. सुरुवातीला मुलींची शाळा असल्याने ते कावरे बावरे होत असत. परंतु नंतर मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी 42 वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावली. सुरुवातीला ते आपल्या घरी राहत होते. त्यानंतर शाळेमधील एका खोलीत त्यांची व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत ते शाळेच्याच वर्गखोलीत राहत आहेत. मे 2020 मध्ये निवृत्त होऊनही आजही ते शाळेसाठी सेवा देत आहेत.









