वृत्तसंस्था/ ओरेगॉन, अमेरिका
भारताची महिला अॅथलीट संजीवनी जाधवने येथे सुरू असलेल्या पोर्टलँड ट्रॅक फेस्टिवल 2023 स्पर्धेत महिलांच्या 10,000 मी. शर्यतीत रौप्यपदक पटकाविले.
वर्ल्ड अॅथलेटिक्स काँटिनेन्टल टूर सिल्वर स्पर्धेत 26 वर्षीय संजीवनीने सहा महिलांचा सहभाग असलेल्या या शर्यतीत 32:46.88 से. ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली. इथिओपियाच्या वेनशेट अन्साने 32:40.03 से. वेळ नोंदवत सुवर्ण आणि अमेरिकेच्या स्टेफनी शेरमनने 34:04.22 से. वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत संजीवनीने प्रथमच 33 मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवली. 2022 मधील फेडरेशन चषक स्पर्धेत तिने 33 मिनिटांहून अधिक वेळ नोंदवली होती. येथील स्पर्धेत संजीवनीने 5000 मी. शर्यतीतही भाग घेतला होता. पण त्यात तिने 15:45.13 से. अवधी नोंदवत 12 वे स्थान मिळविले.
पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीत भारताच्या अजय कुमारने 3:39.19 से. वेळ घेत चौथे स्थान घेतले तर जिन्सन जॉन्सनने दहावे स्थान मिळविले. याशिवाय राहुलने 15 वे स्थान मिळविले. 3000 मी. स्टीपलचेसमध्ये शंकर लाल स्वामीने 11 वे स्थान घेतले.









