फलटण :
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण तालुक्यातील दिग्गज नेते श्रीमंत संजीवराजे नाईक–निंबाळकर यांच्या बंगल्यावरील आयकर विभागाची धाड प्रकरणातील चौकशी दि. 5 पासून सुरू असुन सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी सुरू असल्याचे बंगल्यावरचे चित्र होते. दोन दिवसांच्या चौकशी सत्रातून काहीही निष्पन्न झाले नाही. आयकर विभागाच्या तपास यंत्रणेकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसली तरी चौकशीची प्रक्रिया सुरूच आहे.
आयकर विभागाची चौकशी बुधवार सकाळपासून सुरु असून रात्री उशिरापर्यंत चौकशी झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे गुरुवारी सकाळपासून चौकशी सत्र सुरू असल्याचे बंगल्यावरचे चित्र होते. चौकशी प्रक्रिया दरम्यान सरोज व्हिला बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. राजकीय आकसापोटी सदरची आयकर विभागाची चौकशी असल्याच्या संतप्त भावना कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत.
कार्यकर्ते व विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद करताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले, संजीवराजे दोन नंबरचा नेता नाही. ज्यांना कुणाला वाटले असेल कि, ढिगभर पैसे सापडतील. मात्र, तशी इथे काहीच परिस्थिती नाही. संजीवराजे यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे. आमच्या उत्पन्नाचा सगळा सोर्स व्यवस्थित आहे. कर सुद्धा व्यवस्थित भरला आहे. आमचं सगळं जुनच आहे. नवीन काहीच नाही. महाराष्ट्रातील जुन्या घरांना टार्गेट करणे योग्य नाही. झालं हे बरं झालं. आधिकारी वर्ग सर्व रेकॉर्ड व्यवस्थितीत चेक करत आहेत. त्यांच्याही लक्षात आलं आहे कि, हे दोन नंबरचं घर नाही. कोणतीही वेडीवाकडी गोष्ट केली नाही. फलटण म्हणजे बिहार नसल्याचे सांगत माझे आजोबा श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे सोशालिस्ट बॅकग्राऊंडचे होते. आम्हीही त्याचप्रमाणे वागणारे पुढारी आहोत. या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नसल्याने कार्यकर्त्यांनीही काळजी करू नये, असे आवाहन रघुनाथराजे यांनी केले.
संजीवराजेंचा कार्यकर्त्यांना धीर
बंगल्याबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवुन संजीवराजे व सत्यजीतराजे यांनी बंगल्याच्या प्रवेशव्दाराजवळ जाऊन आतमध्ये सगळं काही सुरळीत चालू आहे. कोणीही काहीही काळजी करू नका, असे आवाहन त्यांनी बंगल्याबाहेरील कार्यकर्त्यांना केले.
संजीवराजेंवरील कारवाईचा आम्ही निषेध करतो
श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकल्याचे समजले. मन बैचेन झाले. या विभागाने अशी कारवाई करण्यापूर्वी त्यांच्याकडून माहिती मागवणे आवश्यक होते. आपण कुठे कारवाई करतोय याची त्यांना जाणीव नव्हती का? या सरकारचे डोके ठिकाणावर नसून अधिकाऱ्यांना अक्कल नाही असे वाटते. वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सासुरवाडी असल्याची कल्पना यांना नाही का? ज्या घराण्याने पिढ्यानपिढ्या जनतेची सेवा केली आहे त्याची परतफेड अशाप्रकारे करणे बरोबर नाही. जनता यांना लवकरच अद्दल घडवेल. या कारवाईचा मी निषेध करतो.
अनिल सुभेदार








