वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनुभवी राजनयिक संजय कुमार वर्मा यांना मंगळवारी कॅनडामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर सद्यकाळात अमेरिकेच्या शिकागोमध्ये भारताचे महावाणिज्यदूत म्हणून कार्यरत अमित कुमार यांना दक्षिण कोरियाती पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती मिळाली आहे. भारतीय विदेश सेवेचे 1988 च्या तुकडीचे अधिकारी आणि सध्या जपानमध्ये भारताचे राजदूत असलेले वर्मा हे लवकरच नवा पदभार स्वीकारणार असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तर अमित कुमार हे 1995 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी आहेत. वर्मा यांनी हाँगकाँग, चीन, व्हिएतनाम आणि तुर्किये येथील भारतीय दूतावासांमध्ये सेवा बजावलेली आहे. इटलीच्या मिलानमध्ये भारताचे महावाणिज्य दूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









