वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मलेशियातील इपोह येथे 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सुल्तान अझलन शहा चषक वरिष्ठांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर करण्यात आला असून बचावळफीत खेळणाऱ्या संजयकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी भारताच्या अनेक वरिष्ठ हॉकीपटूंना विश्रांती देण्यात आली असून त्यामध्ये गोलरक्षक कृष्णन बहाद्दुर पाठक आणि सुरेश करकेरा यांचा समावेश आहे. आता अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी गोलरक्षणाची जबाबदारी पवन आणि मोहीत शशिकुमार यांच्याकडे राहील. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा नियमीत कर्णधार हरमनप्रित सिंग, मनप्रित सिंग आणि मनदीप सिंग यांना वगळण्यात आले आहे. कर्णधार संजय, जुगराज सिंग आणि अमित रोहीदास या तिन खेळाडूंवर बचावळफीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बचावळफीत पुवन्ना, चंदुराज बॉबी, निलम झेस आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. मध्यफळीमध्ये राजिंदर सिंग, राजकुमार पाल, निलकांत शर्मा, एम. रविचंद्र सिंग, विवेकसागर प्रसाद आणि मोहम्मद राहील मुसेन यांचा समावेश करण्यात आला आहे. सुखजित सिंग, शिलानंद लाकरा, सेल्वम कार्ती, आदित्य लालगे, दिलप्रित सिंग आणि अक्षय हे आघाडी फळी सांभाळतील. सदर स्पर्धा राऊंडरॉबीन पद्धतीने खेळविली जाणार असून आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय हॉकी संघाने 2010 साली ही स्पर्धा जिंकली होती तर 2019 साली भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.









