वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांना गुऊवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडी कोठडीत पाठवले. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सुनावणीदरम्यान ईडीने दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली होती. सद्यस्थितीत सिंह 10 ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या कोठडीत राहणार असून यादरम्यान त्यांची चौकशी केली जाणार आहे. अनेक तासांच्या छापेमारी आणि चौकशीनंतर ईडीने सिंह यांना बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानातून अटक केली होती. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून संजय सिंह यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोट्यावधी रुपयांचे मोठे व्यवहार सिंह यांच्या निवासस्थानी झाल्याचा दावा ईडीच्या वकिलाने न्यायालयात केला. यामध्ये एकूण दोन कोटी ऊपयांच्या दोन मोठ्या रकमांचाही समावेश आहे. दिनेश अरोरा यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फोनवरून व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. याचदरम्यान, सिंह यांची बाजू मांडणारे अधिवक्ता मोहित माथूर यांनी ही अटक कोणत्या आधारावर करण्यात आली हे तपास यंत्रणांनी सांगितले पाहिजे. आम्हाला रिमांड पेपर देण्यात यावा, अशी मागणी केली. सिंग यांच्या वकिलाच्या युक्तिवादावर ईडीने लगेचच रिमांड पेपर न्यायालयात सादर केला. सर्व बाजूंचे युक्तिवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने संजय सिंह यांची पुढील पाच दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे.









