वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याच्या नार्को चाचणीला अनुमती देण्यात कोलकत्यातील कनिष्ठ न्यायालयाने नकार दिला आहे. नार्को चाचणीसाठी आरोपीची संमती आवश्यक असते. तथापि, संजय रॉय याने तशी संमती न दिल्याने न्यायालय ती देऊ शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. संजय रॉय याची पॉलिग्राफ चाचणी झालेली असून त्याने या चाचणीत उलटसुलट उत्तरे दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याची नार्को चाचणी करणे आवश्यक आहे, असे सीबीआयने आपल्या अर्जात स्पष्ट केले होते. तथापि न्यायालयाने सीबीआयचा युक्तीवाद मानण्यास नकार दिला आहे. आता सीबीआयला ही अनुमती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.









