पहिले आरोपपत्र दाखल : सामूहिक बलात्कार झाला नसल्याचा सीबीआयचा दावा
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याची शक्मयता तपास यंत्रणेने फेटाळून लावली आहे. मुख्य संशयित संजय रॉय याने हा गुन्हा एकट्याने केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. जवळपास 100 साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर आणि 12 पॉलीग्राफ चाचण्या घेतल्यानंतर सीबीआयने हा निष्कर्ष काढला.
कोलकाता पोलिसातील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याने 9 ऑगस्ट रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केली होती, असा आरोप सीबीआयने आपल्या पहिल्या आरोपपत्रात केला आहे. सीबीआयने तपास हाती घेतल्याच्या 54 दिवसांनंतर सियालदह न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात रॉय याने एकट्यानेच गुन्हा केला असून सामूहिक बलात्कार आणि इतर व्यक्ती, अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप सिद्ध करणारा पुरावा अद्याप सापडलेला नाही, असे स्पष्ट केले.
सीबीआयने रॉय यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64 आणि 66 बलात्कार आणि 103(1) हत्येशी संबंधित आरोप ठेवले आहेत. ‘बीएनएस’च्या कलम 66 मध्ये बलात्कारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यास किमान 20 वर्षे सश्र्रम कारावास किंवा जन्मठेप किंवा मृत्युदंड अशी शिक्षा दिली जाऊ शकते. तसेच कलम 103 (1) अन्वये मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.
9 ऑगस्टला सकाळी ऊग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पीडितेचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला. याप्रकरणी घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी पोलिसांनी संजयला अटक केली. मात्र, संजय अजूनही स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा करत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संजयची ओळख पटवली. फुटेजमध्ये तो 9 ऑगस्टला पहाटे 4 वाजता सेमिनार हॉलमध्ये जाताना दिसत होता. यावेळी त्याने कानात इअरफोन घातले होते. सुमारे 40 मिनिटांनी तो हॉलमधून बाहेर आला तेव्हा त्याच्याकडे इअरफोन नव्हते. पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला ब्लूटूथ इअरफोन संजयच्या फोनला जोडण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पीडितेचे डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचे सांगण्यात आले. मानेचे हाडही तुटले होते. यासंबंधीची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे.