राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सुमारे ४० आमदारांना घेवून एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड केल्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. या बंडखोरीला भाजपने अर्थिक आणि राजकिय ताकत दिल्याचा आरोप वारंवार शिवसेना- ठाकरे गटाकडून केला जात आहे. संजय राउत यांनी संयुक्त राष्ट्राकडे केलेल्या या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्य़ाची शक्य़ता निर्माण झाली आहे.
कालच शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा झाला असून या प्रथमच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरा झाल्याचे दिसून आले. अशातच २० जून हा दिवस जागतिक जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करण्याचे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिलं आहे.
आपल्या पत्रात संयुक्त राष्ट्राला लिहिताना ते म्हणाले, “२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाल्य़ावर त्याच रात्री एकनाथ शिंदे आणि काही आमदार सुरतच्या दिशेने गेले होते. एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आल्य़ानंतर एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदे सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.”
पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक आमदाराने ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “या सगळ्या घटनाक्रमामध्ये शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि यासाठी एकेका आमदाराने ५० खोके म्हणजेच ५० कोटी रुपये घेतले गेले. त्यामुळे २० जून हा सर्व जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात यावा.” असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच “यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल. संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा,” अशीही मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली.








