ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गोरेगावातील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत
(Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत 13 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊत यांची दिवाळी आता तरुंगातच होणार आहे.
राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती. त्यामुळे त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या जामीन अर्जावर आणि नियमित सुनावणीला एकाचवेळी सुरूवात झाली. न्यायालयातील युक्तीवादानंतर हे प्रकरण अत्यंत कॉम्लिकेटेड असल्याने याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असं न्यायालयाने स्पष्ट करत राऊतांच्या कोठडीत 13 दिवसांची वाढ केली.
अधिक वाचा; संकटाच्या काळात सरकार कुठेच दिसत नाही : धनंजय मुंडे
काय आहे पत्राचाळ प्रकरण?
गोरेगावातील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. त्यामुळे या चाळीत राहणाऱ्या लोकांची फसवणूक झाली. राऊतांवर 1034 कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप आहे.
गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळीचे 3 हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी 672 घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं होतं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 83 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी राऊत यांचेही नोंदवण्यात आले होते.








