काँग्रेससाठी अच्छे दिन आले आहेत आणि हे सांगण्यासाठी कोणत्याही एक्झिट पोल, ओपिनियन पोल आवश्यक नसल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल पाच राज्यांच्या निवडणुकांचा एक्झिट पोल बाहेर आला. काँग्रेसच्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन करताना प्रतिक्रिया दिली.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला येणार आहेत. 30 नोव्हेंबरच्या एक्झिट पोलमध्ये 4 राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर होणार असा अंदाज या एक्झिट पोलवरून व्यक्त केला आहे. तर मिझोराममध्ये स्थानिक पक्षांच्या आघाडीचा वरचष्मा राहील असे भाकित व्यक्त होत आहे. या पाच विधानसभा राज्यांच्या एक्झिट पोलचे अंदाज वेगवेगळे असले तरी राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये भाजपला समाधानकारक कामगिरी करता आली आहे. तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेस आपला करिष्मा दाखवण्याची शक्यता आहे.
आप पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसचा विजय हा इंडिया आघाडीचा विजय आहे. विरोधी आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठी ताकद आहे आणि काँग्रेस जर निवडणुका जिंकत असेल तर तो आघाडीचा विजय आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वामुळेच हे झालं आहे.” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.