राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (दुरुस्ती) विधेयक म्हणजे देशाच्या संघीय संरचनेवर केलेला हल्ला असल्याचे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आज सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्यसभेत मांडल्या जाणार्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (दुरुस्ती) विधेयक, 2023 ला विरोध करताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “हे विधेयक म्हणजे भारताच्या संघराज्य रचनेवर हल्ला आहे. निवडणुकीपुर्वी भाजपने दिल्लीला राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु अरविंद केजरीवाल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रात चांगले काम करत आहे. सर्वांना त्यांचा हेवा वाटतो…आम्ही त्यांना पाठींबा देऊच तसेच या विधेयकाचा राज्यसभेत जोरदार विरोध करू.” असेही ते म्हणाले.
उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सोमवारी राज्यसभेत गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक, 2023 सादर करणार आहे. यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी नविन इंडिया या आघाडीच्या नेत्यांनी तसेच सदस्यांनी लोकसभेत सभात्याग केल्यानंतर हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते.









