पुणे / प्रतिनिधी :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवार असे काही करणार नाहीत, हे मी आधीच सांगितले होते. त्याबाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊत हे महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे प्रवक्ते बनतात, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळय़ात गेलेले बळी पाहता सरकारने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी येथे केली.
पटोले म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सुपरमॅन आहे. विविध जिह्याचे पालकमंत्री ते असून सरकारची अनेक खाती त्याच्याकडे आहे. मात्र, अधिवेशनात त्यांच्या खात्याचे लोक उत्तर देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे फाईलचे गठ्ठे फोटोत दाखवण्यापेक्षा त्यांनी आपल्या अपयशाबाबत बोलावे.
जीव गमावले त्याला जबाबदार कोण
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम भरवण्यात आला त्यात अनेक जणांनी जीव गमावला. त्याला जबाबदार नेमके कोण, हे सरकारने सांगावे. या कार्यक्रमासाठी साडेतेरा कोटी रुपये खर्च करण्यात आले. व्यासपीठावरील लोक वातानुकूलित मंचावर बसले, मात्र जनतेसाठी व्यवस्थित जागा नाही की सावली नाही, अशी परिस्थिती होती. राज्यातले मंत्री सांगतात की, आप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांनी वेळ दिलेली होती आणि त्यांच्या वेळेप्रमाणे हा कार्यक्रम घेतला गेलेला होता, असे पटोले यांनी सांगितले.
अधिक वाचा : राष्ट्रवादी, भाजपा, शिंदे गट साथ साथ
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
साडेदहा वाजताचा कार्यक्रम होता. मात्र, स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साडेअकरा वाजता त्याठिकाणी पोहोचले. आणि बारा पासूनच त्याठिकाणी लोकांचे मृत्यू व्हायला सुरुवात झाली. तरी कार्यक्रम चालू होता. त्यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केलेला आहे, असे पटोले यांनी नमूद केले.
सरकारला सर्व गोष्टींची उत्तरे द्यायला लागतील
सरकारच या पद्धतीने वागत असेल तर जनतेने कोणाकडे बघावे. त्यामुळे सरकारला थोडी लाज असेल तर त्यांनी केलेले हे पाप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. मात्र सरकार राजीनामा द्यायला तयार नाही. म्हणून आम्ही राज्यपाल यांना विशेष अधिवेशन बोलवून, त्यामध्ये सर्व चर्चा करण्यात यावी आणि महाराष्ट्राची झालेली बदनामी आणि गमावलेले जीवन याची जबाबदारी कोणाची, या सर्व गोष्टींची उत्तरे सरकारने द्यावी. घटना घडल्यावर ही राज्यकर्ते मुंबई मनपा जिंकणे योजना आखत होते. त्यामुळे या सरकारला जनतेस उत्तर द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.








