खासदार संजय राऊत यांचा भाजपा-शिंदे गटावर घणाघात : इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यागृहात शिवगर्जना मेळावा उत्साहात : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केली टिका
इचलकरंजी प्रतिनिधी
कसब्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेला विजय हे तुमच्या छाताडावरच पहिलं पाऊल आहे. 2024 साली कोण मुख्यमंत्री आणि कोण पंतप्रधान होतय हे कळेल. मग बघू इडी, सीबीआय कोणाच्या दारात उभ्या राहतात, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना शिंदे गटावर केला. इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा उत्साह दिसून येत होता.
खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी कबनूर येथून रॅली काढली. इचलकरंजीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून खासदार राऊत शिवगर्जना मेळाव्यात पोहोचले.खासदार राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी निवडणुक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली होती काय? आतापर्यंत 280 सेना निघाल्या पण त्यापैकी दोनच राहिल्या एक म्हणजे भारतीय सेना व दुसरी शिवसेना. लोकप्रतिनिधी विकत घेता येतील पण निष्ठा विकत घेता येणार नाही. फुटून गेलेल्यांचा सर्जिकल स्ट्राईक जनताच करणार असून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना शिवसेना संपवण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. कसब्यामध्ये आतापर्यंत शिवसेना भाजपासोबत होती म्हणून भाजपाचा विजय होत होता. पण यावेळच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह फुटून गेलेले अनेकजण प्रचारात उतरले तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. आतापर्यंत तुम्ही शिवसेनेच्या खांद्यावर बसूनच राजकारण केले आहे. पण त्याच खांद्यावरून तुमची तिरडी निघाल्याशिवाय राहणार नाही.
माने यांना भाजपच तिकीट देणार नाही
खासदार धैर्यशील माने हे शिवसेनेत टिकणार नाहीत, असा संशय आधीपासूनच होता. तो त्यांनी सिद्ध करून दाखवला. माने यांना खोके मिळाल्याची टिका खासदार राऊत यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांतून पुन्हा धैर्यशील माने यांना शिवसेनेत घेवू नका अशी मागणी झाल्यानंतर माने यांना शिवसेनाच काय पण भाजपाही तिकीट देणार नाही. असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.चोरांकडेही एक तत्त्व असते, निष्ठा असते. ते पण दिलेला शब्द पाळतात. पण पक्षाचे नाव व चिन्ह पळवणाऱ्या गद्दारांची पात्रता तेवढीही नाही. पळवलेले शिवधनुष्य उचलायची ज्यांची लायकी नाही, त्यांना चोर म्हटल्यामुळे चोर, दरोडेखोरांचा अपमान झाला आहे. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
अनाजीपंत उपमुख्यमंत्री
गतवेळी भाजपाशी युती असताना शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद निर्माण करता येणार नाही, हा भाजपाचा धोरणात्मक निर्णय होता असे सांगितले होते. पण आता त्याच पदावर देवेंद्र फडणवीस यांना बसावे लागत आहे. हा नियतीने तुमच्यावर उगवलेला सुड आहे. 2019 ला अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या ॲग्रीमेंटमध्ये मुख्यमंत्रीपदासह सत्तेच वाटप समसमान होईल असे ठरले असल्याचे व मी त्याचा साक्षीदार असल्याचे राऊत यांनी सांगितले. इडी, सीबीआयला घाबरून अनेकांनी शिवसेनेशी गद्दारी केली. पण आपण भगवा फडकावत आत गेलो आणि बाहेर आलो. या भगव्यानेच माझे रक्षण केले आहे. कारण हा भगवा खोक्यातून नव्हे तर निष्ठेतून खांद्यावर घेतला आहे. याला सोडून गेलेल्यांच्या पुढील पिढ्यांच्या कपाळावरही गद्दार असाच शिक्का बसणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
खासदार राऊत यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह
खासदार संजय राऊत यांच्या इचलकरंजी दौऱ्याविषयी शिवसैनिकांची उत्सुकता मेळाव्यात दिसून आली. खासदार राऊत यांचे आगमन झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक, वंचित बहुजन आघाडी, अल्पसंख्याक सेल आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते सत्कार करण्यासाठी मोठया संख्येने स्टेजवर आले. यावेळी त्यांचा उत्साह दिसून येत होता. अखेर सत्कार थांबवा असे म्हणण्याची वेळ संयोजकांवर आली. तसेच खासदार राऊत यांच्या भाषणादरम्यान गद्दार, पन्नास खोके एकदम ओके, टरबूज आदी घोषणा होत होत्या. खासदार राऊत यांनीही याचा यथोचित वापर करत भाजपा व शिवसेना शिंदे गटावर तोफ डागली.
यावेळी संपर्कप्रमुख देवदत्त काळसेकर, बाजीराव मालूसरे, आनंद शेट्टी, अरूण दुधवाडकर, माजी आमदार सुजीत मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, शिवाजी पाटील,सलोनी शिंत्रे, मंगल मुसळे, मंगल चव्हाण, आण्णासो बिलोरे, मलकारी लवटे, महेश बोहरा, धनाजी मोरे, आप्पा पाटील, अस्लम सय्यद, साताप्पा भवान यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.