ऑनलाईन टीम / मुंबई :
मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शिर्डीतील साईबाबा संस्थाननेही यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणीही आजपासून सुरू झाली. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.”
मशिदींवरील भोंगे किंवा कोणतेही भोंगे हा विषय 2005 चा निकाल आहे. मात्र, भाजपाने मनसे सारख्यापक्षाला पुढे करून हा विषय चर्चेत आणला. आता मशिदींवरील भोंग्यांचं निमित्त करून भाजपाने आपलं उपवस्त्र पुढे करून हिंदूंचाही गळा घोटला हे आज स्पष्ट झालं.