ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे, असे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी कोल्हापुरात पत्रकारांनी बोलताना केले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका करत भाजप आणि शिंदे गटाने विधिमंडळात राऊतांवर हक्कभंग आणला होता. हक्कभंगाच्या या नोटीशीला राऊतांनी आज पत्राद्वारे उत्तर दिले आहे.
राऊत यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना हे पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल, असं कुठलंही विधान मी केलेलं नाही. तरीही माझ्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करणे हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्याला काही हरकत नाही. मात्र, माझं विधान नेमकं काय होतं. ते आधी समजून घ्या.
अधिक वाचा : राऊतांना ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मी म्हणालो होतो की, सध्याचे डुप्लिकेट शिवसेनेचे मंडळ हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे. माझ्या या वाक्याचा विपर्यास केला गेला. विधिमंडळ म्हणजे चोरमंडळ असा अर्थ काढून हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला गेला. मी विधिमंडळास चोरमंडळ म्हटले नसून, एका फुटीर गटापुरता हा शब्दप्रयोग वापरला होता. माझं नेमकं विधान काय होतं हे तपासणे गरजेचं होतं.