ऑनलाईन टीम/तरुण भारत
गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीकडून (ED) काल चौकशी करण्यात आली. राऊत यांची १० तासाहून अधिक काळ चौकशी झाली. चौकशीला सामोरेजाण्याआधी संजय राऊत यांनी आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हंटले होते. आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदूत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशापद्धतीने वागायचे, हे आमच्या रक्तात नाही. “प्राण जाए पण वचन ना जाए”, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले. त्यामुळे मी या चौकश्यांच्या बाबतीत निडर आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय.” (shivsena Sanja raut talks on ed)
संजय राऊत यांची शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी १० तासांहून जास्त काळ चौकशी केली. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
प्रासरमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आपल्याला जाणूनबुजून अडकवले जातेय. त्यावेळी आपला अंतरात्मा आपल्याला सांगत असतो की, आपण काही केलेले नाही त्यामुळे कुठलीही चौकशी असो, त्याला सामोरे गेले पाहिजे. त्याच आत्मविश्वासाने मी चौकशीला गेलो आणि १० तासांनी बाहेर आलो. गुवाहटीला जाण्याचा मलाही मार्ग होता. पण मी नाही गेलो. आमची शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलो.”, असे म्हटले.
दरम्यान, मुंबईमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांना, “देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीवर काय सांगाल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना, “यावर मी कसं काय बोलणार? भाजपाने निर्णय घेतलाय त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा. मला अजून फडणवीसांबद्दल बोलताना तोंडामध्ये उपमुख्यमंत्री हा शब्द येत नाही. एक तर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण त्यांना बोलत आलोय. ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जातंय. देवेंद्रजींच्या बाबतीत असं काही झालं किंवा होत असेल तर हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे,” असं राऊत म्हणाले.