शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत यांनी आमदार मनीषा कायंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यामुळे प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे काहीच फरक पडत नसून अशा येणाऱ्या- जाणाऱ्यांना मी कचरा समजतो असे म्हणून त्यांनी मनिषा कायंदे यांच्या पक्षत्यागाची खिल्ली उडवली.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “जाणार आहेत जाऊ देत. काय फरक पडतो? त्या कुठून आल्या हे मला माहीत नाही. त्या कुठे गेल्या हेही माहीत नाही. तसेच त्यांना शिवसेनेत कोणी आणले हेही मला माहीत नाही….तिला आमदार कोणी केले हेसुद्धा मला माहीत नाही….असे लोक येत असतात आणि जात असतात….मी त्यांना कचरा म्हणतो. हवा बदलली कि अशा लोकांचा कचरा इकडे तिकडे उडत असतो. आणि पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. असल्या लोकांशी मी जास्त संबंध ठेवत नसतो.” अशी टिका संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली.
शिवसेनेच्या (UBT) विधानपरिषदेच्या आमदार असलेल्या मनीषा कायंदे यांनी रविवारी शिवसेना (UBT) प्रवक्त्या पदावरून काढून टाकल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्य़ा. मनिषा कायंदे ह्याच्या पक्षत्यागामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मनिषा कायंदे यांच्यामुळे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहेत.