कराड,प्रतिनिधी
Sanjay Raut News : लोकनेते बाळासाहेब देसाई यांना लोकांनी ‘लोकनेते’ ही पदवी का दिली याचा पालक-मालकमंत्र्यांनी अभ्यास करावा. लोकनेते बाळासाहेब देसाई हे केवळ पाटण अथवा सातारचे नेते नव्हते, तर ते महाराष्ट्राचे नेते होते. त्यामुळे नेता कसा असावा याचे उत्तर आजही ‘लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारखा असावा’असे देण्यात येते. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या योगदानात लोकनेत्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नातवाने शेण खाल्ले, तरी लोकनेत्यांचे योगदान विसरता येणार नाही,असे खासदार संजय राऊत म्हणाले.खासदार संजय राऊत रविवारी कराड-पाटणच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी हॉटेल महिंद्रा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम व शिवसैनिक उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, काही जणांनी गद्दारी केली असली,तरी शिवसेनेने ज्या जागा जिंकलेल्या आहेत. त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. त्यानुसार पाटणची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याचे संकेत खासदार राऊत यांनी दिले. सध्याचे पालकमंत्री हे मालकमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यांना मी म्हणजे सरकार वाटत आहे. लोकशाहीत असे चालत नाही. निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या समोर गेले,की मतदार अहंकाराचा पराभव करतात.यांचाही पराभव होणार,असे ते म्हणाले.
महानगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या म्हणून आम्ही सरकारला वारंवार आवाहन करीत आहे.मात्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने सरकार निवडणुका घेत नाही.त्यांच्याकडे भाडोत्री सैन्य आहे आणि भाडोत्री सैन्याच्या जिवावर लढाई जिंकता येत नाही.हे भाडोत्री सैन्यच तुम्हाला बुडवणार,असा टोला संजय राऊन यांनी लगावला.आजचे राज्यकर्ते हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहेत.मात्र लोकशाही देशात हुकूमशाही चालत नाही,हे जनता दाखवून देईल.लोक निवडणुकांची वाट बघत आहेत.राज्यकर्त्यांना निवडणुकीत लोकभावता कळतील,असे संजय राऊत म्हणाले.








