ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या शंभर दिवसांपासून तुरुंगात असणारे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. ३१ जुलै २०२२ रोजी राऊत यांना अटक करून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. यानंतर राऊतांनी केलेल्या जामीन अर्जांना वेळोवेळी ईडीनं न्यायालयात विरोध केला होता. अखेर आज न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला आहे. शिवाय, यावेळी पीएमएलए न्यायालयाने (PMLA Special Court) ईडीला फटकारले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे पीएमएलए विशेष कोर्टाने ईडीवर (ED) ताशेरे ओढले आहेत. ईडीने या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही अटक नसून ईडीने स्वत: च आरोपी निवडले असल्याचे विशेष कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, PMLA न्यायालयासमोर संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्यासोबतच प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे. यावेळी दिलेल्या आदेशामध्ये न्यायालयाने दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आल्याचं नमूद केलं आहे.
“दिवाणी प्रकरणातील वादाला आर्थिक गैरव्यवहार किंवा आर्थिक गुन्ह्याचं लेबल लावल्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला अटक करता येणार नाही. समोर कोण आहे, त्याचा विचार न करता न्यायालयाला जे योग्य आहे, तेच करावं लागेल”, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे.
“समोर आलेली कागदपत्र आणि न्यायालयासमोर झालेल्या सविस्तर चर्चेतून हे स्पष्ट झालं आहे की प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली आहे. हे सत्य स्पष्टपणे समोर आलं आहे”, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.
“म्हाडाचे अधिकारी आरोपी नाहीत का?”
दरम्यान, MHADA च्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांचा एकही अधिकारी या प्रकरणार आरोपी नसल्याचं न्यायलायनं नमूद केलं. “या संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद राहिली आहे. ईडीनंही हे त्यांच्या तक्रारीत मान्य केलं आहे. मात्र, तरीदेखील म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेलं नाही. म्हाडानं स्वत: या प्रकरणात तक्रार दाखल करून न्यायालयाच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही”, असा उल्लेख न्यायालयानं आदेशपत्रात केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट असताना राऊतांना अटक करून ईडीनं विशिष्ट लोकांनाच अटक करण्याचं धोरण दाखवलंय, असं न्यायालयाने नमूद केलं. “राकेश आणि सारंग वाधवान या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. मात्र, त्यांना ईडीनं अटक केलेली नाही. ते मोकळे फिरत आहेत. मात्र, त्याचवेळी ईडीनं संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.यातून ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते. जर न्यायालयानं ईडी आणि म्हाडाचे दावे स्वीकारले, तर ईडीच्या या वृत्तीवर शिक्कामोर्तब केल्यासारखं होईल. सामान्य, प्रामाणिक आणि निर्दोष लोकांचा न्यायालयावरचा विश्वास उडेल”, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.