सांगली प्रतिनिधी
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी हिंदकेसरी बनवून मोठ्या लढाया लढाव्यात, सांगलीचा आग्रह करत गल्लीची लढाई करू नये. असे आवाहन करत खा. संजय राऊत यांनी आपल्या तीन दिवसांच्या सांगली दौऱ्याला प्रारंभ केला. सकाळी दहा वाजता राऊत यांचे हेलिकॉप्टरने कवलापूर येथील विमानतळ मैदानावर आगमन झाले. त्यानंतर आणि हॉटेलवरही राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सांगलीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फोनवर बोलून शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे महविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी दूरध्वनीवरून केल्याचे पत्रकारांना सांगितले. दिवसभर ते विविध नेते आणि संघटनांची भेट, मेळावे घेणार असून रविवारपर्यंत सांगलीत थांबून रणनीती आखणार आहेत. महाराष्ट्रातील ४८ जागा तीन पक्ष लढवत असल्या तरी या जागा आम्ही महाविकस आघाडीच्या मानतो. राज्यात आम्ही एकत्र लढलो तर त्याचा फायदा काँग्रेसला केंद्रात सरकार बनविण्यासाठी होईल. सांगलीत सुध्दा आमची लढाई त्यासाठी आहे. काँग्रेसला त्यांचा प्रधान मंत्री नको असेल तर त्यांनी तसे सांगावे. आमचे तुमचे करणे हे राष्ट्रीय पक्षाचे काम नाही. हिंदकेसरीने गल्लीतली कुस्ती करू नये. सांगली, भिवंडीत सेना, राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर झालेत आता दिल्लीत निर्णय होणार नाही. भिवंडीत आम्ही राष्ट्रवादीला मदत करू. सांगलीत त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या आदेशाची वाट पाहू नये असे संजय राऊत म्हणाले.
आलात तर तुमच्यासह…
मित्रपक्ष सहकार्याबद्दल पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एकदा चंद्रहार पाटील यांना आम्ही मैदानात उतरवले आहे म्हणजे मागे पडणार नाही. हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. सध्या जी आहे त्याला मी नाराजी मानत नाही. याल तर तुमच्यासह आणि न याल तर तुमच्याशिवाय… ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ५५ वर्षाची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून ही जागा आम्ही जिंकू. रामटेक, कोल्हापूर, अमरावती या जागा आम्ही वारंवार जिंकत आलो आहोत तरीही काँग्रेसने मागितल्या, आम्ही दिल्या. त्याबाबत वाद घालत बसलो नाही. त्यामुळे सांगलीच्या बाबतीतही काही तिढा राहील असे आपणास वाटत नाही असे सांगून ही जागा आपला पक्ष जिंकेल असा दावाही खा. राऊत यांनी केला.
विशाल, विश्वजित आमचेच…
आमचे पक्ष वेगळे असतील, निवडणुकीत उमेदवारी वेगवेगळ्या पक्षांना मिळत असते. तीन पक्ष आहेत वाटाघाटीत काही मतदारसंघ सुटतात. सांगलीत विशाल पाटील आणि विश्वजित आमचेच आहेत. वसंतदादांपासून पतंगराव कदम यांच्यापर्यंत आमचा स्नेह होताच. यापुढेही असेल. महाविकास आघाडी म्हणूनही आम्ही एक आहोत. पुढे विशाल पाटील यांना कसे संसदेत पाठवायचे ती आम्हीही जबाबदारी पार पाडू असे सांगलीत उतरताच खा. राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.