ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, असे आवाहन खा. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील पत्रकार परिषदेत केले होते. हे सरकारविरोधी वक्तव्य राऊतांना भोवलं आहे. या वक्तव्याप्रकरणी राऊतांवर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी तेथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्तासंघर्षाच्या न्यायालयाच्या निकालावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. राज्यातील सरकार अपात्र आमदारांच्या भरवशावर आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे जनतेने घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असलेल्या सरकारच्या नियमांचे पालन करू नये, पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये, असे आवाहन राऊत यांनी केले होते.
सरकारविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी राऊतांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम 505 अंतर्गत राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








