ग्रामसभेत झाली बिनविरोध निवड
गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील – मोरे
कळे प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय दिनकर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी प्रदीप सातपुते यांनी अर्ज दाखल केला होता. पण गावांतील सत्ताधारी आणि विरोधी गटात झालेल्या बैठकीमध्ये समिती अध्यक्ष पदाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर सातपुते यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे मोरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग खुला झाला. या निवडीनंतर सर्व ग्रामस्थांनी मोरे यांचा सत्कार केला. सरपंच शारदा पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभा आयोजित केली होती. पण तत्कालिन तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण पाटील यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली . पंधरा दिवसांपूर्वी पाटील यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे गुरुवारी (26 रोजी) अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित केली होती.
अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गटाकडून संजय दिनकर मोरे तर विरोधी गटाकडून प्रदिप बळवंत सातपुते यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ग्रामसभेमध्ये मतदानाद्वारे निवड प्रक्रिया पाडावी लागणार होती. परिणामी गावांत पुन्हा राजकीय वातावरण तापून हेवेदावे आणि ईर्ष्येचे राजकारण होण्याची शक्यता होती. त्यामुळे गावांतील दोन्ही गटातील ज्येष्ठ व्यक्ती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन ही निवड बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. त्यानुसार झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात संजय मोरे यांना अध्यक्ष पद देण्याचा निर्णय झाला. तर दुसऱ्या टप्प्यात प्रदिप सातपुते यांना अध्यक्ष पद देण्याचे निश्चित झाल्यामुळे सातपुते यांनी अध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज माघारी घेतला. त्यामुळे मोरे यांची निवड बिनविरोध झाली. या निवडीनंतर ग्रामसभेमध्ये उपस्थित ग्रामस्थांनी मोरे यांचा सत्कार केला. गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी ग्रामसेविका ज्योती पाटील, गावकामगार तलाठी पी.के.मिठारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हेते.









