आत्ताचे महाराज हे शाहू महाराजांचे खरे वारसदार नसून ते कोल्हापूरात दत्तक आलेले आहेत. त्यामुळे शाहू विचारांचे खरे वासरदार हे आम्हीच असल्याचे विधान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे कोल्हापूरातील राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीची जोरदार प्रचारयंत्रणा सुरू असून या प्रचारामुळे राजकिय टिका आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी चंदगड तालुक्यातील नेसरी या गावात महाराजांवरती जोरदार टिका केली. त्यांच्या या टिकेमुळे अनेक राजकिय पडसाद उमटण्याची शक्यता असून कोल्हापूरसह राज्यभरातील राजकिय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
नेसरीमध्ये बोलताना संजय मंडलिक यांनी सध्याचे शाहू महाराज हे कोल्हापूरातले नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे आपण कोल्हापूरची जनताच शाहू विचारांचे खरे वारसदार आहोत. माझ्या वडीलांनी सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूरोगामी विचार जपला,” असं संजय मंडलिकांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमधील राजकिय लढतीवर भाष्य करताना त्यांनी मल्लाला हातच लावायचा नाही….मल्लाला टांगच मारायची नाही…मग ती कुस्ती कशी होणार? अशी विचारणाही केली.