प्रतिनिधी,कोल्हापूर
स्वर्गिय सदाशिव मंडलिक यांनी शेतकरी संघ व सभासदांच्या हितासाठीच भवानी मंडप येथील जागा खरेदी केली होती. हीच जागा ताब्यात घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.याच्या विरोधात सर्वपक्षीय लढा उभारला आहे. याबाबत खासदार संजय मंडलिक यांनी मौन का बाळगले आहे?असा सवाल उपस्थित करून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पदवीधरचे अध्यक्ष अनिल घाटगे यांनी केली.
भवानी मंडप येथील शेतकरी संघाच्या जागेचा ताबा प्रशासनाने घेतला. या संदर्भात आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या शेतकरी संघ आजी-माजी पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना घाटगे पुढे म्हणाले, शेतकरी संघ अडचणीत आल्यानंतर तत्कालिन राज्य सरकाने स्वर्गिय मंडलिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी त्यांनी अवघ्या 3.50 लाख रुपयांना ही जागा घेतली. त्यावेळी त्यांच्यावर शेतकऱ्यांचा पैसा चुकीच्या पध्दतीने वापरत असल्याची काही लोकांनी टीका केली. त्याच टिकाकारांना आपली चुक लक्षात आली आणि मोक्याची जागा खरेदी केल्याबद्दल मंडलिकांच्या भुमिकेला पाठींबा दिला. हीच जागा आज पालकमंत्री व जिल्हाधिकारी जागा ताब्यात घेत आहेत. यासाठीच खासदार मंडलिक यांनी वडिलांनी घेतलेली जाग वाचविण्यासाठी काय करणार ? त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. असे थेट आव्हानही घाटगे यांनी यावेळी दिले.
पद उपभोगलेले किती लोक बैठकीसाठी उपस्थित ?
अॅड.बाबा इंदूलकर म्हणाले,या संघात यापूर्वी पदे भोगली.चेअरमन झाले,संचालक झाले.त्यापैकी किती लोक उपस्थित राहिले ? अशी खंत व्यक्त केली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी हे आदेश काढले आहेत.त्यांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक ठिकाणी त्यांची लोकांच्या मागणीवरूनच दुसरीकडे बदली झाली असल्याचे सांगितले. मुकुंद पाटील (कसबा बीड) यांनी जिल्हाधिकारी रेखावार लोकहिताचे निर्णय घेत नाहीत. असा आरोप केला. लोकहिताची अनेक आंदोलने केली पण दखल घेतली नाही. परंतु मोक्याच्या जागा हडप करणाऱ्याची सुपारी घेऊनच ते काम करत असल्याचाही आरोप केला.
प्रशासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार
अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले की, शेतकरी संघ हा जिल्हयाचा मानबिंदू आहे. हा वाचविण्यासाठी आम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. सहकार कायद्यानुसार ही जागा कोणालाही ताब्यात घेता येणार नाही. बेकायदा ताब्यात घेतल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी रेखावार यांच्या विरोधात न्यायालयात जाऊया. यासाठी जिल्हा बार असोसिएशन एक रुपया न घेता शेतकरी संघाचे वकिल पत्र घेईल. असेही त्यांनी सांगितले.









