उद्या पदभार स्वीकारणार : शक्तिकांत दास यांच्या जागी वर्णी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नवे गव्हर्नर असतील. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गव्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली. ते विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा घेतील. उद्या बुधवार, 11 डिसेंबर 2024 रोजी संजय मल्होत्रा नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत आहे. संजय मल्होत्रा आरबीआयचे 26 वे गव्हर्नर असतील. त्यांची नियुक्ती आगामी तीन वर्षांसाठी आहे.
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. सध्या ते महसूल सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आता त्यांच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांनी आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केले आहे. तसेच अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
वित्त आणि कर आकारणीचा व्यापक अनुभव
संजय मल्होत्रा यांनी आपल्या महसूल विभागातील 33 वर्षांच्या कारकिर्दीत व्यवसाय, वित्त आणि कर, आयटी, खाणकाम यासह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. यापूर्वी त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणीचा व्यापक अनुभव आहे.
शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ उत्कृष्ट
शक्तिकांत दास यांचा मागील सहा वर्षांचा आरबीआयमधील कार्यकाळ उत्कृष्ट राहिला होता. ते सुमारे 6 वर्षे आरबीआयचे गव्हर्नर होते. उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. दास यांनी कोविड काळात आणि नंतर देशातील महागाईची समस्या नियंत्रित करण्यासाठी उल्लेखनीय कार्य बजावले आहे.









