सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निवड
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी माडखोल माजी सरपंच संजय लाड यांची तर सचिवपदी साटेली येथील संजय नाईक यांची निवड करण्यात आली आहे.राज्य विद्युत ग्राहक संघटना संलग्न आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाच्या पाठिंब्यावर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली असुन प्रत्येक तालुक्यात तालुका संघटना बांधणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमी उद्भवणाऱ्या विद्युत वितरणच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता सक्षम जिल्हास्तरीय संघटनेसह जनतेच्या एकजुटीची आवश्यकता होती. विद्युत वितरण कंपनीचे खाजगीकरण झाल्यानंतर तर वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या विज वितरण कंपनीवर कुणाचा तरी वचक असावा यासाठी
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये तालुका संघटना बांधणी पूर्ण झालेली आहे. सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत निखिल नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना का स्थापन झाली? आणि संघटनेचा भविष्यात काय फायदा होईल? व संघटना कशासाठी आवश्यक आहे? संघटनेचा उद्देश काय आहे? याबाबत मार्गदर्शन केले. ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी ग्राहकांचे हक्क, विद्युत वितरण कंपनीने द्यावयाच्या सर्व सुविधा, ग्राहकांच्या असलेल्या समस्या आणि त्याचे निवारण कसे कोण अधिकारी करतील, विद्युत वितरणच्या उच्चपदस्थ कोणत्या अधिकार्यांकडे तक्रार द्यायची? याबाबत माहिती दिली.
शनिवार २६ ऑगस्ट रोजी बैठक
या बैठकीत उर्वरीत तालुका कार्यकारणी निवड करायची असून सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेमध्ये तालुक्यातील वीज ग्राहकांना स्वेच्छेने समाजकार्य म्हणून काम करावयाचे असेल त्यांनी आणि वीज ग्राहकांनी आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका सचिव संजय नाईक यांनी केले आहे.









