मतदारयादीशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मीडियावरील पोस्टद्वारे महाराष्ट्राच्या मतदारयादीशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याबद्दल निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या दोन एफआयआर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक तज्ञ संजय कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले. संजय कुमार यांच्या जाहीर माफीनंतरही एफआयआर दाखल करण्यात आल्याची ज्येष्ठ वकील विवेक तनखा आणि वकील सुमीर सोधी यांच्या युक्तिवादाची सरन्यायाधीशांनी दखल घेतली. याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने ‘नोटीस जारी करा. मात्र, यादरम्यान कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये’, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) येथील लोकनीतीचे सह-संचालक संजय कुमार यांनी महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले दोन एफआयआर रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एफआयआरमध्ये त्यांच्यावर ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टद्वारे महाराष्ट्राच्या मतदारयादीशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याचा आरोप आहे.









