करिश्मा कपूरचे पूर्व पती : पोलो सामना खेळताना अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ लंडन
‘सोना कॉमस्टार’चे अध्यक्ष आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे पूर्व पती संजय कपूर यांचे 12 जून 2025 रोजी इंग्लंडमध्ये वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी पोलो सामना खेळत असताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खेळादरम्यान त्यांच्या तोंडात मधमाशी गेल्यानंतर श्वासनलिकेत अडकल्यामुळे ते खेळ थांबवून मैदानाबाहेर गेले. त्यानंतर काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. अखेरचा श्वास घेण्याअगोदर काही तासांपूर्वीच संजय कपूर यांनी गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघाताबद्दल सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले होते.
पोलो हा आपला आवडता खेळ खेळत असताना संजय कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय कपूर केवळ एक यशस्वी उद्योजकच नव्हते तर त्यांच्या आवडीने आणि प्रतिभेने अनेक लोकांची मने जिंकणारे पोलो खेळाडू देखील होते. संजय कपूर हे ‘सोना कॉमस्टार’चे अध्यक्षही होते. 2003 मध्ये त्यांचे लग्न करिश्मा कपूरशी झाले होते, परंतु 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला समीरा आणि कियान ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर संजयने 2017 मध्ये मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेवशी विवाह केला होता.
मधमाशी तोंडात गेल्याचे निमित्त…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कपूर इंग्लंडमधील प्रतिष्ठित गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो सामना खेळत होते. खेळादरम्यान एक मधमाशी त्याच्या तोंडात शिरल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. संजय यांनी खेळ थांबवण्याची विनंती करत मैदानाबाहेर जाणे पसंद केले. परंतु त्यानंतर लगेचच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत देऊनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका हेच सांगितले जात आहे.









