वसगडे, वार्ताहर
Sangli News : पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना पलुस तालुक्यातील वसगडे येथे शेतकऱ्यांच्या जमिनीवर रूळ टाकत रेल्वेने वाहतूकही सुरू केली.दरम्यान, शेतीकडे जाणारे रस्ते,पावसाचे पाणी जाणाऱ्या मोहरी ओघळ वाटा रेल्वे विभागाने मुजवून टाकल्या याबाबत गेल्या वर्षभरापासून रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.पण अधिकाऱ्यांनी चालढकल केल्याने तीन दिवसापासून शेतकरी नागाव गेटवर ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत.याबाबत अधिकाऱ्यांच्याकडून तोडगा निघत नसल्याने खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे बाधीत शेतकऱ्यांना भेट घेतली.
शेताकडे जाणाऱ्या रस्त्याची अडचण स्वतः जाऊन पाहणी करीत, शेतीतील झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती महिला शेतकऱ्यांनी खासदारांना दिली. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.जिल्हाधिकारी,रेल्वे विभागातील सर्व अधिकार नुकसानग्रस्त शेतकरी आणि कंत्राटदार यांची संयुक्त मिटिंग सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ११ सप्टेंबर रोजी घेऊन यावर ठोस निर्णय घेणेस भाग पाडू, रस्ता करणेसाठी कोणता फंड गरजेचा आहे ते पाहून उपलब्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी राहील,असे आश्वासन संजय काका पाटील यांनी दिलं.
यावेळी जि.प.सदस्य सुरेंद्र वाळवेकर,पं.स.सदस्य अमोल पाटील,उपसरपंच अनिल पाटील,क्रांती कारखान्याचे संचालक संजय पवार,बाळू हजारे,सुनील पाटील,अरुण सुर्यवंशी,बजरंग गुरव,सुनील पाटील,गजानन केरीपाळे, अजित पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड,विद्यमान संचालक महेद्र लाड,उद्योगपती रफिक जमादार यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला.संयुक्त बैठकीत तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे शेतकरी रजत पाटील यांनी सांगितले.








