देशातला सर्वात मोठा गॅसवीज प्रकल्प असलेल्या आरजीपीपीएल या कंपनीला अखेरची घरघर लागली असून गेल्या नऊ महिन्यांपासून कंपनीकडून वीज निर्मिती बंद असल्याची माहीती समोर येत आहे. वीज खरेदीदार नसल्याने RGPPL कंपनी वर्षाला 200 कोटीहून अधिकचा तोटा सोसत असल्याची माहीती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकर परिषद घेऊन दिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने RGPPL प्रकल्प बंद होण्याची भिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनी व्यक्त केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून कंपनीकडून वीज निर्मितीच बंद करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.
या वीज उत्पादन बंदचा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. हा प्रकल्प बंद पडल्याने अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. कधीही विजेची मागणी आल्यास कंपनी पूर्ण क्षमतेने वीज देईल असा विश्वास संजय अगरवाल यांनी व्यक्त केला. गेल्या जून महिन्यात एका दिवसात 1350 मेगावॉट वीज निर्मिती करून नॅशनल ग्रीडला विजनिर्मितीचे प्रात्यक्षिक दिल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या बाबतीत गंभीर होऊन विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.









