कोणत्या प्रसंगी लोक कसे वागतील आणि कोणत्या समजुतींच्या आहारी जातील, याची कल्पना करता येणेही कठीण आहे. चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी हाँगकाँगमधील लोकांनी सॅनिटरी पॅडस् आणि डायपर या वस्तूंचा उपयोग करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या हाँगकाँग या शतकातील आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या ‘रागसा’ नामक वादळाची दोन हात करीत आहे. अनेक लोकांवर या वादळाचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे लोक स्वत:ला वाचविण्यासाठी, एरवी मूर्खपणाचे वाटतील, असे उपाय करीत आहेत. या वादळामुळे हाँगकाँग शहरात प्रचंड वारा सुटला असून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. बंद केलेल्या खिडक्यांच्या काचांनाही न जुमानता अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरे आतूनही ओलीचिंब होत आहेत. अशा घरांमध्ये राहणे नागरीकांसाठी कठीण जात आहे. पण बाहेरही पडता येत नसल्याने नागरीकांची चांगलीच कोंडी झाली आहे. अशावेळी खिडक्यांमधून घरात पाणी शिरु नये. म्हणून तेथील अनेकांनी एक आश्चर्यकारक असा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी घरांच्या खिडक्यांना सॅनिटरी पॅडस् आणि डायपर्स बांधण्यास प्रारंभ केला आहे. या दोन्ही वस्तू पाणी शोषून घेतात. त्यामुळे त्या पावसाचे पाणी शोषतील आणि त्यामुळे ते पाणी घरात येणार नाही, असे तर्कशास्त्र या उपायामागे योजण्यात आले आहे. येथील लोकांच्या म्हणण्यानुसार हा उपाय बऱ्यापैकी प्रभावी ठरत आहे. तथापि, या वस्तू इतक्या मोठ्या वादळासमोर टिकाव धरु शकत नाहीत, असाही अनुभव लोकांना येत आहे. कारण वादळ आणि प्रचंड पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी खिडक्यांमधून घरामध्ये पेत आहे. मात्र, काहीच न करण्यापेक्षा हा उपाय करुन बघावा, असे प्रथम काही लोकांच्या मनात आले. नंतर त्यांचे अनुकरण करुन इतरांनाही हा उपाय करण्यास प्रारंभ केला. काही लोकांनी तरी प्लॅस्टिकच्या कचरा पिशव्यांमधूनही पाणी गोळा करण्याचा प्रयत्न चालविला असल्याची माहिती आहे.









