अरूण तळेकर, बाजारभोगाव
Kolhapur News : गौरी गणपतीच्या सणाला भाऊ आपल्या बहिणीला तिच्या सासरी जावून शिदोरी देण्याची परंपरा आहे.माहेरी हा सण साजरा करण्यासाठी तिला खरतरं आमंत्रण देण्यासाठी ही शिदोरी असते.शिदोरीत असणारे गोडाचे पदार्थ मग घरोघरी वाटले जातात. हल्ली रेडीमेड बुंदीचे रव्याचे लाडू ,खाजा ,जिलेबी ,म्हैसूर पाक अशा पदार्थांची शिदोरी दिली जात असल्याचे पहायला मिळते.एकीकडे गोडधोड पदार्थांची शिदोरी दिली जात असताना एका शिक्षक भावान पाटपन्हाळा (ता. पन्हाळा ) येथे राहणाऱ्या बहिणीला सॕनिटरी नॕपकीनची अनोखी शिदोरी दिली आहे.मासिक पाळीचे योग्य नियोजन न केल्याने महिलांना अनेक रोगांना सामोरे जावे लागते.याबाबत जनजागृती व्हावी.बहिणीसह गावातील महिलांचे आरोग्य सुरक्षित रहावे.यासाठी शिदोरीचा हा नवा पायंडा पाडणाऱ्या भावाचे सध्या कौतुक होत आहे.
गौरी गणपतीच्या सणाला बहिणीला शिदोरी देण्याची परंपरा आजही कायम आहे. पूर्वी भाजी भाकरी,चपाती -आळूवडी ,अथवा चवळीची उसळ पुरणपोळ्या अशी होम मेड शिदोरी सासरवासीण बहिणीला दिली जात होती.आजही मोजक्या ठिकाणी जुन्या पध्दतीने शिदोरी दिली जाते.मात्र आता धावपळीच्या युगात अनेकजण आपापल्या कामात व्यस्त असतात. शिदोरीसाठी पदार्थ तयार करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे बाजारात मिळणारी मिठाई ,गोड धोड रेडीमेड पदार्थच शिदोरी म्हणून दिले जातात.या पारंपारिक परंपरेला जपत एका भावाने नवा पायंडा पाडला आहे.
नांदारी (ता. शाहूवाडी ) येथील अनिल कांबळे हे प्राथमिक शिक्षक आहेत.दक्षिण शाहूवाडीतील कांटे गावात ते कार्यरत आहेत.अतिशय दुर्गम असणाऱ्या या भागात मुलींच्या ,महिलांच्या मासिक पाळीबाबत अज्ञान आहे.पारंपारिक पध्दतीने पाळीचे नियोजन केले जाते.त्यामुळे महिलांच्या आजारपणात भर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे वाड्या -वस्त्यांवर जावून स्लाईड शो द्वारे त्यांनी प्रबोधन करायला सुरूवात केली.मेडीकल जवळ नसल्यामुळे सॕनिटरी नॕपकीन मोफत वाटप करून त्यांनी किशोरवयीन मुली व महिलांचे प्रबोधन केले.जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे.कोल्हापूरचा पॕडमॕन म्हणूनही त्यांची ओळख आहे.त्यांची पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) येथे अलका दिनकर कांबळे ही बहिण राहते.पंचवीस वर्षापूर्वी त्यांचे दिनकर कांबळे यांच्याशी लग्न झाले आहे.त्या तेथील अंगणवाडीत मदतनिस म्हणून कार्यरत आहेत.यापूर्वी तिला गौरी गणपतीच्या सणाला गोडाधोडाचीच शिदोरी दिली जात होती.यंदा मात्र सॕनिटरी नॕपकीनची शिदोरी दिली आहे.
गावातील महिलांना बोलवून ही शिदोरी सोडण्यात आली.हळदी कुंकू देवून सॕनिटरी नॕपकीनचे उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले.बहिणी बरोबर तिच्या संपर्कातील सर्व महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी अनिल कांबळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.अशा नव्या पायंड्यांची लोकचळवळ होणं गरजेचं आहे.यावेळी दिनकर कांबळे यांच्यासह आशा स्वयंसेविका सुनिता सुरेश पाटील,अंगणवाडी सेविका रेखा लक्ष्मण सुतार,मदतणीस शुभांगी विश्वास तेली ,मीरा सागर कांबळे आदी महिला भगीनी उपस्थित होत्या.
ग्रामीण भागात मासिक पाळीबाबत खुलेपणानं बोललं जातं नाही.त्याचं व्यवस्थापनही बऱ्याच महिला जुन्या पध्दतीने करतात.त्यामुळे लैंगिक आजार ,कॕन्सर होतो.त्यामुळे याबाबत जनजागृती व्हावी.यासाठीच हा नवा पायंडा सुरू केल्याचे अनिल कांबळे यांनी तरूण भारत संवादशी बोलताना सांगितले.कदाचित भावाने गोडधोड पदार्थाऐवजी सॕनिटरी नॕपकीनची शिदोरी दिली म्हणून काही लोक नाव ठेवतील.परंतू भावाने एका चांगल्या गोष्टीची सुरूवात केल्याने मला त्याचा अभिमान आहे.प्रत्येक भावाने बहिणीसाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.अशी अपेक्षा अलका कांबळे यांनी व्यक्त केली.