दुबईतील स्पर्धेच्या दुहेरीत पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था/ दुबई
सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला असून त्यासरशी तिची शानदार कारकीर्द संपुष्टात आली आहे. मंगळवारी येथे अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजसह खेळताना तिला सरळ सेट्समध्ये पराभूत व्हावे लागले. सानिया आणि कीज यांना व्हर्नोकिया कुदेरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा या बलाढय रशियन जोडीने एका तासात 6-4, 6-0 असे नमवले.
25 वषीय व्हर्नोकिया एकेरीमध्ये 11 व्या आणि दुहेरीत पाचव्या क्रमांकावर आहे, तर ल्युडमिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर आहे. 2003 मध्ये व्यावसायिक टेनिसपटू बनलेल्या आणि सध्या 36 वर्षांच्या असलेल्या सानियाने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावलेली असून त्यापैकी तीन किताब तिने स्वित्झर्लंडची दिग्गज खेळाडू मार्टिना हिंगिससह मिळविले. याशिवाय सानियाने तिच्या तीन मिश्र्र दुहेरीपैकी दोन किताब (2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 मध्ये फ्रेंच ओपन) महेश भूपतीसोबत पटकावले, तर अन्य एक किताब ब्रुनो सोरेससोबत मिळविताना तिने अमेरिकेन ओपनमध्ये जेतेपद मिळविले.
दुबईत झालेल्या सामन्यात सुऊवातीच्या सेटमध्ये 4-4 अशा बरोबरी झाली होती. पण कुदेरमेटोवा आणि सॅमसोनोव्हा यांनी सानिया आणि कीज जोडीची सर्व्हिस पुन्हा एकदा भेदत 5-4 अशी आघाडी घेतली आणि पुढे सेट अगदी आरामात आपल्या नावावर केला. दुसऱ्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये सानिया आणि तिच्या जोडीदाराची सर्व्हिस भेदली गेली. त्यानंतर हा सामना एकतर्फी राहिला.
मागील महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कारकिर्दीची अखेर ग्रँड स्लॅम किताबाने करण्याची तिची संधी अंतिम फेरीत पोहोचूनही हुकली होती. मिश्र दुहेरी गटात सानिया व रोहन बोपण्णा या जोडीला ब्राझीलच्या लुईसा स्टिफनी व राफायल मातांव या जोडीने 7-6(2), 6-2 असे पराभूत केले होते.









