वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आपल्या 100 व्या कसोटी सामन्याच्या आधी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी बुधवारी भेट घेतली. भेटीनंतर पुजाराने ट्विटरवर आपल्या चाहत्यांना त्याची माहिती दिली आणि 100 व्या कसोटीपूर्वी पंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे हा एक सन्मान होता. माझ्या 100 व्या कसोटीपूर्वी त्यांनी साधलेला संवाद आणि दिलेल्या प्रोत्साहनाला सदैव आठवणीत ठेवेन, धन्यवाद’, असे पुजाराने ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या भेटीबाबत ट्विट केले आहे. ‘पूजा आणि आपल्याला भेटून आनंद झाला. 100 व्या कसोटीसाठी आणि कारकिर्दीसाठी शुभेच्छा’, असे त्यात मोदी यांनी म्हटले आहे.
पुजारा 17 फेब्रुवारीपासून दिल्ली येथे खेळविल्या जाणाऱया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा तो भारतातर्फे 100 कसोटी सामने खेळण्याचा टप्पा गाठणारा केवळ 12 वा खेळाडू ठरेल. क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खेळलेला असून 200 सामने खेळणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
पुजारा आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळलेला आहे. 2010 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने आपल्या 13 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत 44.15 च्या सरासरीने 7,021 धावा केल्या आहेत. नाबाद 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून एकूण 19 शतके आणि 34 अर्धशतके त्याने नोंदविलेली आहेत. गेल्या वर्षी पाच सामन्यांमध्ये त्याने 45.44 च्या सरासरीने 409 धावा केल्या आणि त्यात एक शतक, तर तीन अर्धशतके फटकावली. यावर्षी तो फक्त एकच सामना खेळला आहे, त्यात त्याने एका डावात फक्त सात धावा केल्या.









