वृत्तसंस्था/ चार्लस्टन (अमेरिका)
रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील चार्लस्टन महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि तिची झेकची साथीदार लुसी ऱहॅडेका यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
डब्ल्युटीए टूरवरील 500 क्लेकोर्टवरील या स्पर्धेत महिला दुहेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात चौथी मानांकित जोडी आंद्रेजा क्लिपॅक आणि लिनेट यांनी सानिया मिर्झा व ऱहॅडेका यांचा 6-2, 4-6, 10-7 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. हा सामना अडीच तास चालला होता. या स्पर्धेत सानिया आणि लुसी यांनी टॉप सीडेड जोडी झेंग शुआई व कॅरोलिन डोलेहाईड यांचा उपांत्य सामन्यात 6-2, 4-6, 10-8 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. येत्या मे महिन्यात होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सानिया मिर्झा सहभागी होणार असून 2022 च्या टेनिस हंगामाअखेर ती निवृत्तीची घोषणा करेल.