सांगरूळ / गजानन लव्हटे :
लोकप्रतिनिधी व लोकवर्गणी याला श्रमदानाची जोड देऊन आदर्शवत विकास काम कसे करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणून सांगरूळ येथील जोतिबा देवालय परिसराचा केलेला कायापालट होय. जोतिबा भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्यापातून वेळ देऊन सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, बाहेर येणारे भाविक व लोकवर्गणीच्या माध्यमातून मुळातच असलेल्या नैसर्गिक विविधतेचा वापर करत आदर्शवत काम केल्याने हा परिसर येथे येणाऱ्यांच्या मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. यामुळे येथे भाविक व पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सांगरूळच्या पश्चिम बाजूस असलेल्या डोंगरात ग्रामदैवत जोतिर्लिंगाचे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी दसऱ्यामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरातन बसणारी व्यक्ती एकदा मंदिरात गेली तर त्यांनी नवरातन संपेपर्यंत मंदिरातून खाली गावात यायचं नाही अशी येथील नवरात्री उत्सवाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या नसल्याने दगड धोंड्यातून पायवाटेने मंदिराकडे पायीच जावे लागत होते. नवरातन बसलेल्या व्यक्तींसाठी नऊ दिवस आंघोळीचं पाणी, चहा व दोन वेळचा फराळ हा घरातून पोहोच होत होता. नवरात्र काळात घरातील एक व्यक्ती या नवरातन करणाऱ्याच्या सेवेत असायची. मंदिर परिसरात झालेल्या विकास कामामुळे आज या ठिकाणी भाविकांची संख्या वाढली आहे.
- लोकवर्गणीतून दगडी पायऱ्या
गावातील बाजारवाडा येथे असलेल्या ज्योतिर्लिंग पादुका कमानीपासून ते जोतिबा देवालयापर्यंत लोक वर्गणीतून दगडी पायऱ्या बसवल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र सांगरुळ येथील शाखेचे तत्कालीन मॅनेजर स्व. अनिल वैद्य यांनी गावातील सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते एकत्र करत 1989 ला या पायऱ्या बसवण्याचे काम लोक वर्गणीतून पूर्ण केले आहे. त्यावेळी 1500 रुपये वर्गणी देणाऱ्याचे पाच पायरीच्या एका टप्प्याला नावाची पाटी बसवली होती. या उपक्रमाला सांगरूळ परिसरातील इतर गावातील लोकांनीही लोक वर्गणी देऊन साथ दिली होती.
- सांस्कृतिक सभागृह उभारणी
सुरुवातीस मंदिराच्या सभोवताली लाकडी खांबावर असलेले पत्र्याचे शेड होते. दसऱ्यामध्ये नवरात्र उत्सवात पाऊस पडल्यास भाविकांना निवाऱ्याची मोठी अडचण होत होती. कोल्हापूर जिह्याचे ज्येष्ठ नेते खासदार स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी 2005 साली पाच लाख रुपये खर्चाचे प्रशस्त सांस्कृतिक सभागृह उभा केले. नवरात्र काळात भक्तांची वाढती संख्या असल्याने त्यांनी खासदार फंडातून याच ठिकाणी दुसरे संस्कृतिक सभागृह दिले. आमदार चंद्रदीप नरके यांनी वीस लाख रुपये खर्चाचा सांस्कृतिक हॉल दिला आहे. याशिवाय ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मंदिराच्या समोर अंडरग्राऊंड हॉल व सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी दोन लोखंडी शेड उभा केली आहेत. पुरुष व महिला भाविकांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची ााsय सुविधा केली आहे.
- पाणीपुरवठ्याची सुविधा
ग्रामपंचायतीने गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेतून स्वतंत्र मोटार बसूवून देवालयापर्यंत पाईपलाईनच्या साह्याने पाणीपुरवठा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते भगवानराव लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याची टाकी बांधून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- मंदिर परिसराचे सुशोभीकरण
माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्तिगत बारा लाख रुपये खर्चाची मंदिराच्या प्रवेश द्वारावर भव्य आकर्षक दगडी कमान उभी केली आहे. तसेच पेव्हिंग ब्लॉकसाठी दहा लाख निधी दिला आहे. करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी मा प. सं. सदस्या अर्चना खाडे, भाजपचे दिलीप खाडे व सहकारी तसेच कुंभी कासारी साखर कारखान्याने जेसीबी देऊन सहकार्य केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील (शिंगणापूरकर) यांनी हायमास्ट लाईट दिली आहे. मंदिराच्या मागील बाजूस वड व देशी फुलांची झाडे आहेत. या सर्व विकासकामात बाहेरून येणारी भक्त मंडळी व ग्रामस्थ यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.
- हेमाडपंथी दगडी बांधकामातील मंदिर
मंदिराचा गाभारा व समोरील मुख्य हॉल पूर्णपणे दगडी बांधकामात केलेला आहे. जोतिर्लिंग भक्त मंडळाने लोकवर्गणीतून या दगडी बांधकामावर नंतरच्या काळात लावलेल्या फरश्या व रंग हटवल्याने मंदिरास मूळ स्वरूप प्राप्त झाले आहे.
- धार्मिकतेबरोबर पर्यटनाचे ठिकाण
पूर्वी नवरात्र उत्सवात नवरातनकरी संख्या कमी होती. आता ही संख्या दरवर्षी वाढत जाऊन सध्या पाचशेच्या आसपास झाली आहे. प्रत्येक पौर्णिमा तसेच श्रावण महिन्यातील व पाकळणीतील रविवारी येथे महाप्रसाद वाटप केला जातो. या ठिकाणी केलेल्या विकास कामामुळे पर्यटकांची ही संख्या वाढली आहे .
- तेली व भक्त मंडळाचे योगदान
मंदिरातील पूजा आरती व अभिषेक यासारखी धार्मिक कामे गावातील तेली समाजातील लोक रोटेशन पद्धतीने करतात. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील हॉल या समाजाने बांधला आहे. तसेच गावातील जोतिर्लिंग भक्त मंडळाचे श्रीपती खाडे, सर्जेराव खाडे, प्रशांत सासणे, महादेव तोरस्कर, राजाराम चाबूक, आनंदा चव्हाण, महादेव खाडे, अनिल नाळे, सर्जेराव चव्हाण, गणपती नावे, सुरेश खाडे, विक्रम सासणे, बाजीराव खाडे, एकनाथ नाळे हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मंदिर परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात
- मंडलिक कुटुंबीयांचा वरदहस्त
जिह्याचे नेते खासदार स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी आपल्या फंडातून दोन सांस्कृतिक हॉल माजी खा. संजय मंडलिक यांनी दहा लाख पेव्हिंग ब्लॉक व स्वखर्चातून बारा लाखाची प्रवेश कमान बांधून दिली आहे. मंदिर परिसरात झालेल्या विकास कामात या कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे.








