ऑनलाईन टीम / पुणे :
भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे विरोधी पक्षनेते होण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी काँग्रेस हायकमांडला 30 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर तीस आमदारांच्या सह्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. काँग्रेसचे 45 आमदार असल्याने विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे. या पदासाठी सुरूवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत होती. मात्र, ही नावे मागे पडली. त्यानंतर यशोमती ठाकूर, विजय वड्डेटीवार आणि सुनील केदार या दुसऱ्या फळीतील नेत्यांची नावे पुढे आली आहेत.
याच दरम्यान, आ. संग्राम थोपटे यांनी विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेस हायकमांडला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यावर 30 आमदारांच्या सह्या आहेत. या आमदारांनी थोपटेंना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, काँग्रेस हायकमांडने अद्याप कोणत्याही नेत्याच्या बाजूने आपला कल दर्शविलेला नसल्याची माहिती आहे.








