वार्ताहर/नंदगड
भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर लढले. त्यापैकी संगोळ्ळी रायण्णा एक होत. रायण्णा एक केवळ कुरबर समाजाचे किंवा कर्नाटकपुरते नव्हे तर ते सर्व समाजाचे व देशाचे महापुरुष होते. त्यामुळे त्यांचा सर्वत्र राष्ट्रवीर म्हणून उल्लेख झाला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पार्टीचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले. गेल्या 17 वर्षांपासून प्रजासत्ताक दिन व संगोळ्ळी रायण्णा यांचा स्मृतिदिन यानिमित्त राष्ट्रीय समाज पार्टीतर्फे नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते.
शिवाय राष्ट्रीय समाज पार्टीची राष्ट्रीय स्तरावरील बैठक घेतली जाते. त्याचप्रमाणे रविवारी नंदगड येथे रायण्णांच्या समाधी स्थळाचे पूजन व पुतळ्dयाला अभिवादन करून पूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धाप्पा अक्कीसागर होते. यावेळी मखनापूर (विजयपूर) येथील गुरुपीठाचे सोमेश्वर स्वामी, जोखानहट्टी (गोकाक) येथील योग सिद्धेश्वर आश्रमाचे बिळीयान सिद्ध स्वामी, रामदुर्ग येथील पूर्णानंद आश्रमाचे कृष्णानंद स्वामी, राष्ट्रीय समाज पार्टीचे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष शिवलिंगाप्पा किन्नूर, पक्षाचे तेलंगणाचे प्रभारी रमाकांत करगटला, रासपाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष काशिनाथ शेवेते, कुमार शिशुपाल (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय संघटक गोविंदराम सुरनर, शिवलिंगापा जोगिन आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.
रासपाची राष्ट्रीय बैठक
26 जानेवारीनिमित्त नंदगड येथे राष्ट्रीय समाज पार्टीची राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विविध राज्यांतून आलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यातील राष्ट्रीय समाज पार्टीच्या पक्ष संघटनेबद्दल माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे संस्थापक महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नंदगड व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.









