सांगली :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्यावतीने चंद्रग्रहणानिमित्त सांगलीतील खगोलप्रेमी नागरिकांसाठी ‘चला पाहूया दुर्बिणीतून चंद्रग्रहण’ हा कार्यक्रम डॉ. निटवे हॉस्पिटल विश्रामबागच्या टेरेसवर पार पडला. सांगली मधील खगोलप्रेमी नागरिकांनी दुर्बिणीतून चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.
डॉ. संजय निटवे यांनी या चंद्रग्रहणाबद्दल शास्त्रीय माहिती दिली. ते म्हणाले की, चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ग्रहण पाहणे अशुभ नाही. गरोदर मातेवर आणि गर्भावर ग्रहणाचा वाईट परिणाम होतो अशी भीती घातली जाते. पण याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ग्रहणामुळे गर्भाला व्यंग निर्माण होत नाही तर ते जनुकीय दोषामुळे किंवा काही औषधामुळे वा व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे निर्माण होते. सोनोग्राफीद्वारे केलेल्या तपासणीत बाळांचे ओठ, हातपाय हृदय इत्यादी अवयवांमध्ये दोष आहे की नाही हे कळते. तरीही ग्रहण पाळणे यासारखी अनावश्यक कृती करायला लावून गरोदर स्त्रीयांना फार मानसिक त्रास दिला जातो. हे थांबवण्यासाठी सरकारने आरोग्य खात्यामार्फत समाजजागृती करणे आवश्यक आहे. खगोल अभ्यासक डॉ. निटवे पुढे म्हणाले, अमेरिकेत नासासारख्या संस्था समाजमाध्यमांद्वारे अशी वैज्ञानिक माहिती देऊन लोकशिक्षण करीत असतात, मग आपल्या देशात हे का होत नाही? यावर सरकारने विचार करायला हवा.
अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर ग्रहणाविषयी अत्यंत चुकीचे आणि गैरसमज पसरणारे मेसेजेस फिरत आहेत. ‘तुमच्या राशीला हे चंद्रग्रहण अशुभ आहे, त्यासाठी कर्मकांड करा’ अशा अंधश्रद्धा परवणाऱ्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये. ग्रहणामुळे अन्नपाणी दूषित होत नाही. ग्रहणातून कोणतेही हानिकारक किरण बाहेर पडत नाहीत. विज्ञानलेखक जगदीश काबरे म्हणाले की, विवेकी विचारांच्या जनतेने ग्रहणास अशुभ मानून या सुंदर खगोलीय घटनेस बदनाम करू नये. ग्रहणावेळी आकाशातील शनि, शनीचे कडे तसेच अभिजीत, हंस, श्रवण ही नक्षत्रे खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे यांनी दाखवली.
अभिषेक माने, कौस्तुभ पोळ यांनी दुर्बिणीतून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून चंद्रग्रहणाच्या विलोभनीय कला तसेच शनीग्रहाची कडी व त्यांचे चंद्र यांचे प्रतिमा टिपल्या. खगोलप्रेमींनी ग्रहणाविषयी गैरसमज दूर करण्यास मदत केली. डॉ. शोभना निटवे, डॉ. शीतल प्रसाद भरमगुडे, कौस्तुभ पोळ, दिनेश कुडचे, सुदर्शन चोरगे, सुहास गवळी, अमित काटकर, पुनम पाठक, शिवप्रताप काटकर आदी उपस्थित होते.








